पावसाचे नागपूरकर सुखावले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

नागपूर : दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारी दमदार हजेरी लावली. दुपारी रामदासपेठ, मानेवाडा, बेसा, नंदनवन, सदर, गोधनी, वाडी, दिघोरी, नारीसह शहरात सर्वदूर पाऊस धो-धो बरसला. हवामान विभागाने विदर्भात रविवारपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

नागपूर : दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारी दमदार हजेरी लावली. दुपारी रामदासपेठ, मानेवाडा, बेसा, नंदनवन, सदर, गोधनी, वाडी, दिघोरी, नारीसह शहरात सर्वदूर पाऊस धो-धो बरसला. हवामान विभागाने विदर्भात रविवारपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत विलंबाने एंट्री घेणाऱ्या मॉन्सूनने औपचारिक हजेरी लावत उसंत घेतली. शनिवारपासून अपवाद वगळता आठवडा कोरडा गेला. जून महिना संपत आल्याने शेतकऱ्यांसह नागपूरकर पावसाची वाट बघत होते. शनिवारी वरुण राजाने नागपूरकरांची इच्छा पूर्ण केली. विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने हजेरी लावल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी आडोशाला उभे राहून पावसापासून स्वत:चा बचाव केला. बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा हट्ट पूर्ण केला. बच्चेकंपनी घरांच्या गच्चीवर आणि रस्त्याने जलधारा अंगावर घेतानाचे चित्र दिसून आले. दोन ते अडीच तासांपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले.
अनेक भागांमध्ये सायंकाळनंतरही अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभरात 10 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्याच दमदार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. सीताबर्डीतील उड्डाणपुलावर चांगलेच पाणी साचले होते. त्यावरून भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे पाणी पुलाखालून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर कोसळत होते. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in Nagpur