विदर्भात अवकाळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला.

नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला.
भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विक्रीसाठी राइस मिल व बाजारात आणलेल्या धानाचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला व तुरीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. परंतु, रब्बी पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. सध्या उशिरा येणाऱ्या धानाची कापणी व चुरणे सुरू आहे. ज्यांच्याकडे आधीच चुरणे झाले, त्यांनी मिलिंग व विक्रीसाठी धानाचे पोते बाजारात आणले आहेत. अशावेळी अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे उघड्यावर ठेवलेले धान ओले होऊन कोंब येण्याची भीती आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सातही तालुक्‍यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तिरोडा शहरात सकाळी तुरळक पाऊस पडला. तसेच नागपूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.
यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तूर शेंगांवर आली आहे. अशास्थितीत ढगाळी वातावरण झाल्याने तुरीवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच दिग्रस तालुक्‍यातील बोरी, तुपटाकळी, मांडवा, हरसूल, इसापूर आदी गावांना वादळाचा फटका बसला आहे. आर्णी तालुक्‍यातील खडका तांडा येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन घरांची पडझड झाली. तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात तुकाराम जाधव, अनसूया कनाके, धर्माजी उईके यांच्या घराची पडझड झाली. तर लक्ष्मण मडावी यांचे घर पूर्णत: कोसळले.

Web Title: Rainfall in Vidarbha