संततधार पावसाची जोरदार "बॅटिंग'

संततधार पावसाची जोरदार "बॅटिंग'
नागपूर : वरुणराजाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात गुरुवारी जोरदार "बॅटिंग' केली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले. शहरात बारा तासांत तब्बल 75 मिलिमीटरची नोंद करण्यात आली. परिणामी दैनंदिन जनजीवनही विस्कळीत झाले. नागपूर वेधशाळेने येत्या 48 तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे शुक्रवारी व शनिवारी जोरदार पावसाची शक्‍यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी दहाच्या सुमारास उत्तर नागपुरातील काही भागांमध्ये मुसळधार बरसल्यानंतर शहरात दिवसभर संततधार होती. दुपारी चारनंतर पावसाचा जोर वाढला. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी जमा झाले होते. खोलगट भागांमध्ये कुठे गुडघाभर तर कुठे मांडीभर पाणी साचले होते. त्यामुळे चाकरमान्यांचीही तारांबळ उडाली. वाहने बंद पडल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. पावसामुळे नाग व पिवळी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहिल्या. जवळपास पंधरा दिवसांपासून शहरात वरुणराजाचा मुक्‍काम असून तापमानही तीन अंशांनी घसरून 25.2 अंशांवर आले. हवेतही गारठा निर्माण झाला आहे. संततधार पावसानंतरही कुठेही पाणी शिरल्याच्या अग्निशमन विभागाकडे तक्रारी आल्या नाहीत. केवळ मेडिकल चौक व सतरंजीपुरा भागातच दोन झाडे पडल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्‌टा पश्‍चिमेकडे सरकत चालला असला तरी, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचीही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे. मॉन्सून यंदा दोन आठवडे उशिरा दाखल झाल्यानंतरही यवतमाळ व वाशीमचा अपवाद वगळता विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून, सर्वसामान्य नागरिकही आनंदात आहे. नागपूर वेधशाळेने शहरात सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांत 75 मिलिमीटरची नोंद केली. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 633 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात अली आहे. दोन दिवसानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्‍यता आहे.
फुटाळा "ओव्हरफ्लो'च्या उंबरठ्यावर
पावसामुळे अंबाझरी, फुटाळासह शहरातील अन्य तलावांमध्ये पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. तरुणाईचे "डेस्टिनेशन' असलेला फुटाळा "ओव्हरफ्लो'च्या उंबरठ्यावर आहे. हवामान विभागाने 48 तासांत दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात, लवकरच फुटाळा "ओव्हरफ्लो' होण्याची शक्‍यता आहे. भरपावसातही गुरुवारी फुटाळावर नागपूरकरांनी गर्दी केली होती.
सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने येत्या 48 तासांत विदर्भातील नागपूर व अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे. विशेषत: नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी व नाल्यांच्या काठावरील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष सज्ज
संभाव्य अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आश्रय देण्यासाठी लगतच्या मनपा शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जीर्ण घरे पडणे, रस्त्यावरील झाडे कोसळणे, वाहतुकीच्या मुख्य रोडवर तसेच अंतर्गत रस्त्यावर पाणी तुंबणे, आदी घटना प्रामुख्याने घडतात. पावसामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये, याकरिता मनपाच्या केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांसाठी नियंत्रण कक्षातील अधिकारी 0712-3031101 किंवा 0712-2567777 या दूरध्वनीवर किंवा 0712-3031101, 101, 108 या वायरलेस क्रमांकावर रात्रभर उपलब्ध राहणार असल्याची माहिती, मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com