अधिवेशनासाठी कडक बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

अडीच हजार पोलिस सज्ज; १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर धुरा
नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी जवळपास अडीच हजार पोलिस अधिकारी व  कर्मचारी सुरक्षा बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. अधिवेशन काळात विधानभवनाची सुरक्षेची जबाबदारी १० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्तासाठी नागपुरात येणार आहेत.

अडीच हजार पोलिस सज्ज; १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर धुरा
नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी जवळपास अडीच हजार पोलिस अधिकारी व  कर्मचारी सुरक्षा बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. अधिवेशन काळात विधानभवनाची सुरक्षेची जबाबदारी १० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्तासाठी नागपुरात येणार आहेत.

बंदोबस्तासाठी यावर्षीय ११ पोलिस उपायुक्‍त-पोलिस अधीक्षक, ३० सहायक पोलिस आयुक्‍त, ७० पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, २२५ पोलिस उपनिरीक्षक, ६० महिला पोलिस उपनिरीक्षक, १,८०० पोलिस कर्मचारी, २०० महिला पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस दलाच्या ७ प्लाटूनचा समावेश आहे. सोबतच नागपुरातील वरिष्ठ अधिकारी सुरक्षाव्यवस्था सांभाळतील. रामगिरी, देवगिरी, विधानभवनसोबतच अन्य मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयाच्या सुरक्षेसाठी गुप्त पथकांची नेमणूक केली आहे.

यंदा मुंबई (शहर आणि ग्रामीण), ठाणे, पुणे (शहर आणि ग्रामीण), औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, अकोला, सीआयडी, नांदेड, नाशिक, यवतमाळ, वाशीम येथून पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर पोलिस दलातील कर्मचारी आणि नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांचीही सेवा घेण्यात येणार असल्याची माहिती विशेष शाखेने दिली.

विधानभवन व शहरातील मोर्चे पॉइंटसह मोर्चेकऱ्यांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. अधिवेशन काळात कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी पोलिस सतर्क राहतील. तसेच श्‍वान पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथकासह विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो तैनात केले आहेत. शहरातील अतिसंवेदनशील परिसरात अतिरिक्‍त सुरक्षा तैनात करण्यात येईल. शहरातील तब्बल गस्तिपथके, चार्ली कमांडो आणि विशेष गस्ती वाहने सुरक्षेसाठी सज्ज असतील.

सीसीटीव्हींची नजर
विधानभवन, मुख्यमंत्र्याचे निवास, रामगिरी, देवगीरीसह मोर्चे पॉइंटवर सीसीटीव्ही बसविले आहे. तसेच मनपाच्या वतीने लावलेल्या कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात येणार आहे. दोन ड्रोन कॅमेरेसुद्धा आहेत. मोर्चा पॉइंटवर पाच वॉच टॉवर उभारले आहे. तसेच सीओसी वाहनाच्या माध्यमातून रस्त्यांवरील हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अस्थायी स्वरूपाचे पोलिस नियंत्रण कक्षही तयार केला आहे.

वाहतूक पोलिसांची परीक्षा
विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक पोलिस बंदोबस्त आहे. मात्र, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करताना पोलिस आयुक्‍ताची परीक्षा असणार आहे. तसेच सामान्य नागरिकांना किंवा वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी वाहतूक पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

शहरभर नाकाबंदी
पावसाळी अधिवेशनात कोणतीही अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था कोलमडू नये यासाठी शहरात चौकाचौकात नाकेबंदी सुरू केली आहे. दिवसातून तीन ते चारवेळा नाकेबंदी विविध परिसरात लावण्यात येत आहे. संशयित व्यक्‍ती आणि वाहनांवर पोलिस नजर ठेवून आहेत.

Web Title: rainy session vidhan bhavan police bandobast