ईव्हीएमविरोधात 14 सप्टेंबरला उठाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नागपूर ः संपूर्ण देशात ईव्हीएमवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. सर्वत्र संताप आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक बॅलेटपेपरवर घेण्यात यावी, या मागणीसह ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाचे संस्थापक फिरोज मिठीबोरवाला, निमंत्रक रवी भिलाणे, प्रशांत पवार व इतर सर्वपक्षीय नेत्यांनी 14 सप्टेंबरला उठाव करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडील ईव्हीएम मशीन द्यावी, आम्ही "हॅक' करून दाखवितो, असे आव्हानही त्यांनी दिले.

ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलनने 23 ते 31 ऑगस्टपर्यंत ईव्हीएमविरोधी महाराष्ट्र यात्रा काढली. ही यात्रा आज नागपुरात पोहोचल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. ईव्हीएम सत्ता हस्तगत करण्याचे शस्त्र बनले आहे, असा आरोप राष्ट्रीय जनआंदोलनचे संस्थापक फिरोज मिठीबोरवाला यांनी केला. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असे यापूर्वीच अनेक शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय भाजपला ज्या जागा हव्या होत्या, तेथे निवडणुकीपूर्वीच ईव्हीएममध्ये प्रोग्राम सेट करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगावरही त्यांनी तोफ डागली. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा निवडणूक आयोग करीत आहे. परंतु, त्यांच्याकडील मशीनला ते तज्ज्ञांना हात का लावू देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएमवर जीपीएस असल्याचे आयोग सांगतो, मग 20 लाख गायब मशीन कुठे आहे? या प्रश्‍नाचे उत्तर का देत नाही, असेही ते म्हणाले. सरकारच्याच तांत्रिक समितीला आयोग उत्तर देत नसल्याचेही ते म्हणाले. निमंत्रक भिलाणे यांनी महाराष्ट्रात आगामी निवडणूक बॅलेटपेपरवर घेण्यात यावी, यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. ईव्हीएमविरोधात जनक्षोभ उसळण्याची शक्‍यता असून जनताच या मशीन तोडण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली. ईव्हीएमविरोधात विविध राज्यांत समित्या तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रात येत्या 14 सप्टेंबरला सर्वच शहरात ईव्हीएमविरोधात उठाव करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलनच्या ज्योती बडेकर, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शब्बीर विद्रोही, विदर्भ राज्य आघाडीचे अनिल जवादे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raise on September 14 against EVMs