दिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

नागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी त्यांना आशा होती. मात्र, वस्तूंना खरीददार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. कमाई नाही झाली तर आम्ही खाणार तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

उज्ज्वल भविष्याच्या आशेने काही दिवसांपूर्वी कोटा (राजस्थान) येथील जवळपास ३० ते ४० लोहार बांधव दरवर्षीप्रमाणे सहपरिवार शहरात दाखल झालेत. रामदासपेठ, खामला, रेशीमबाग, रविनगर वर्धा रोडसह अनेक भागांतील फुटपाथवर दुकाने थाटून, ते हाताने तयार केलेल्या तवा, कढई, खलबत्ते, सराटे, पावशी, पोळपाट-बेलणे, चाळणी, स्लायसर आदी गृहोपयोगी सामानांची विक्री करीत आहेत. अहोरात्र मेहनत करून तयार केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळत नसल्यामुळे ते कमालीचे चिंतित आहेत.

दिवसभर प्रतीक्षा करूनही एका दमडीचीही विक्री होत नसल्याचे दु:ख रामकिशन यांनी बोलून दाखविले. रामकिशन म्हणाले, सकाळपासून दुपार झाली, अद्याप एकही गिऱ्हाईक फिरकला नाही. बोहणीसुद्धा झाली नाही.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खूपच कमी प्रतिसाद आहे. दिवसभरात एखादा ग्राहक आला तरच थोडीफार कमाई होते. अनेक जण भाव विचारून जातात, तर कुणी नुसतीच चेष्टा करतात. गेल्या अनेक दिवसांपासून कमी अधिक  प्रमाणात हीच परिस्थिती आहे. आमच्या इतरही बांधवांचे हेच हाल आहेत. हरदीलाल, सुनाबाई आणि बोरीबाई हेदेखील चिंतित दिसून आले. या कारागिरांकडे राजस्थानात उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. ना शेती, ना घर. खानदानी व्यवसाय असल्यामुळे लोहारकामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नागपुरात कमाई नसल्यामुळे आम्हाला लवकरच गाशा गुंडाळून घराकडे परतावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

मॉल संस्कृतीचा फटका
राजस्थानच्या या कारागिरांना वाढत्या मॉल संस्कृतीचा फटका बसला. बहुतांश नागपूरकर मोठमोठ्या मॉल्स तसेच दुकानांमध्ये जाऊन उत्तम क्‍वालिटीच्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळेच स्वस्त असूनही रस्त्यांवरील वस्तूंना ग्राहकांची मागणी कमी आहे. गरिबांचा अपवाद वगळता कुणीच त्याच्याकडून वस्तू खरेदी करीत नाहीत. रामकिशन यांनीही अल्प प्रतिसादामागे हीच शक्‍यता वर्तविली.

थंडीतच उघड्यावर निवारा 
राजस्थानच्या या लोहार बांधवांचे आयुष्यच उघड्यावर आहे. त्यांचे राहणे-खाणे सर्वच  फुटपाथवर आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे दिवसेंदिवस थंडी वाढत आहे. त्यामुळे कुडकुडत्या थंडीतच त्यांना फुटपाथवर रात्र काढावी लागत आहे. थंडीचा सर्वाधिक फटका त्यांच्या चिमुकल्यांना होत आहे. तरीही थंडीची पर्वा न करता केवळ पोटासाठी ते उघड्यावर आयुष्य काढत आहे. 

मुले शिक्षणापासून वंचित
अनेक परिवारांमध्ये लहान मुले-मुली आहेत. मायबाप अशिक्षित असल्यामुळे त्यांची नवी पिढीही अशिक्षित बनली आहे. पोटालाच अन्न नाही, तर मुलांना शिकविणार तरी कसे. त्यांची मुले दिवसभर फुथपाटवर उघडी-नागडी हिंडत असल्याचे निराशाजनक चित्र नजरेस पडले. मुळात ही जमातच भटकी आहे.

Web Title: Rajasthan Artisan