राजे मुधोजी भोसले यांनी केली तोफांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

कस्तुरचंद पार्कवर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक चबुतऱ्याच्या भोवती रस्ता बांधण्यात येत आहे. त्यासाठी चार फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तेथे या तोफा आढळून आल्या. यासोबत दोन उखळी तोफा (मॉर्टर) व त्याचे स्टॅण्डदेखील सापडले आहेत.

नागपूर : सौंदर्यीकरणासाठी खोदकाम सुरू असताना कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी चार तोफा आढळून आल्या. या तोफा अंदाजे दोनशे वर्षांपूर्वीच्या भोसलेकालीन असल्याचा अंदाज पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला आहे. सध्या या तोफा लष्कराने ताब्यात घेतल्या असून उद्या शुक्रवारी पुढील संशोधनासाठी त्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. राजे मुधोजी भोसले यांनी तोफांची पाहणी केली.
कस्तुरचंद पार्कवर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक चबुतऱ्याच्या भोवती रस्ता बांधण्यात येत आहे. त्यासाठी चार फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तेथे या तोफा आढळून आल्या. यासोबत दोन उखळी तोफा (मॉर्टर) व त्याचे स्टॅण्डदेखील सापडले आहेत. तोफा लांबच्या पल्ल्यासाठी तर मॉर्टर शत्रूवर जवळून मारा करण्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या. सकाळी तोफा सापडल्याची बाब उघडकीस येताच, वास्तूतज्ज्ञ अशोक मोखा व इतिहास संशोधक कस्तुरचंद पार्क येथे पोहोचले. काही छंदिष्ट लोकांनी तोफांची लांबी व रुंदी मोजून त्या पाण्याने स्वच्छ केल्या. याची माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाला देण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे नागपूरकर राजे मुधोजी भोसले यांनीही तोफांची पाहणी केली. सध्या या तोफांची शहरात सर्वत्र चर्चा असून, याबाबत कुतूहल आहे. कस्तुरचंद पार्क राजे भोसले यांची युद्धभूमी होती. काळाच्या ओघात त्या जमिनीत दबल्या असाव्यात असा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raje mudhoji bhosle visited kasturchan park