आमदार काशीवार यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

साकोली (जि. भंडारा) : साकोलीचे भाजप आमदार राजेश काशीवार यांना अपात्र ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

साकोली (जि. भंडारा) : साकोलीचे भाजप आमदार राजेश काशीवार यांना अपात्र ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश काशीवार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सेवक वाघाये यांना पराभूत केले होते. पराभूत उमेदवार सेवक वाघाये यांनी या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. काशीवार सरकारी कंत्राटदार असतानाही त्यांचा निवडणूक अर्ज स्वीकारण्यात आला. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती. सरकारी कंत्राटदारांच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी काशिवार यांनी 20 ऑक्‍टोबर 2014 ला अर्ज केला व त्यांचा अर्ज 27 ऑक्‍टोबर 2014 ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य अभियंत्यांनी मंजूर केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना काशीवार हे सरकारी कंत्राटदार होते. शिवाय निवडून आले तेव्हाही ते कायम होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना अपात्र ठरविले होते.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला काशीवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने आमदार काशीवार यांना दिलासा देत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. तोवर काशीवार यांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेण्यास व हजेरी पुस्तिकेत सही करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. या काळात त्यांना विधिमंडळातील कोणत्याही मतदानात मत देता येणार नाही व भत्ते घेता येणार नाही.

Web Title: rajesh kashiwar news