"राजगृहाच्या निळ्या स्पंदनां'नी भारावले प्रेक्षक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता जीवनप्रवास उभा करणारा "राजगृहाची निळी स्पंदने' या प्रयोगाने यशवंत स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक भारावले. बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

दीडशे कलावंतांचा सहभाग असलेल्या आणि गीत, नृत्य, नाट्य, निवेदनाने रंगलेल्या या सांगीतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, आमदार अनिल सोले, आमदार जोगेंद्र कवाडे, गौतम पाटील, सुमित्रा जाधव, लता यादव, मनीषा घोडेस्वार, वर्षा ठाकरे, डॉ. रामदास सोनोने, रवींद्र देवतळे व्यासपीठावर होते. भव्य रंगमंच, आकर्षक नेपथ्य आणि डोळे दिपविणारी प्रकाशयोजना विशेषत्वाने आकर्षित करून गेली. भायखळ्याच्या भाजीबाजारात पावसाच्या साक्षीने रमाबाई आणि भीमराव यांच्या लग्नाचा प्रसंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचा प्रसंग अतिशय कसबीने उभे करण्यात आले. 1932 ची दुसरी गोलमेज परिषद, त्यातील बाबासाहेब आणि गांधीजींचे वक्तव्य हा प्रसंग प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करणारा ठरला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू आणि बाबासाहेब यांच्यात झालेल्या संभाषणाचा प्रसंगही नाटकात उभा करण्यात आला. बाबासाहेबांनी बालवयात सोसलेला अन्याय, अत्याचार नाटकाच्या माध्यमातून बघून प्रेक्षकांचे डोळे पाणावले. बोधी फाउंडेशनचे ललित खोब्रागडे आणि अर्चना खोब्रागडे यांच्या निवेदनाने रंगत वाढवली. भुपेश सवाई, लकी, विकास बोरकर, संदीप बारस्कर, किशोर बत्तासे, अमित व सनी, सुरेंद्र वानखेडे, प्रशांत लिखार आणि बोधी फाउंडेशनच्या कलावंतांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: rajgrahachi nili spandane programme