राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यात दिलजमाई? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कृषी प्रदर्शन 28 ते 1 जूनदरम्यान असून, या दोघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय सत्यकार यांनी साधली

नागपूर : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व त्यांचेच सहकारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढली. राज्यमंत्री खोत यांची भाजपशी वाढती जवळीक, यामुळे दोघांत अनेक दिवसांपासून विसंवादाचे चित्र आहे. आता हे दोघेही कन्हानमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात एकाच मंचावर येणार असून, दिलजमाईची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

कृषी प्रदर्शन 28 ते 1 जूनदरम्यान असून, या दोघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय सत्यकार यांनी साधली.

पारशिवनी तालुक्‍यातील कन्हान येथील कुलदीप मंगल कार्यालयात त्यांनी चारदिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून, खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उद्‌घाटनासाठी आमंत्रित केले. नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यमंत्री खोत यांनी स्तुतीसुमने उधळली होती. यावर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना अर्थसंकल्पातील जास्त कळतं म्हणून त्यांनी प्रशंसा केल्याचा टोला लगावला होता.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत भाजपवासी होणार असल्याच्या शक्‍यतेने राजू शेट्टी कमालीचे दुखावले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार राजू शेट्टी यांचे फोनही घेत नसल्याची चर्चा आहे. दोन्ही स्वाभिमानी नेत्यांमध्ये नागपुरात दिलजमाई व्हावी, अशी अपेक्षा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह राजकीय पंडितही व्यक्‍त करीत आहेत. त्यामुळे आता अनेकांचे लक्ष कन्हानमधील कृषी प्रदर्शनाकडे लागले आहे.

Web Title: Raju Shetty and Sadabhau Khot to come on one stage in Nagpur