आता "मंत्र्यांचे कपडे फाडा' - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर गंभीर नसलेल्या फडणवीस सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडा' आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर गंभीर नसलेल्या फडणवीस सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडा' आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शेतकऱ्यांचे प्रश्‍न, तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार शेट्टी नागपुरात आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचे काहीही गांभीर्य नाही.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना जून 2017 मध्ये जाहीर केली होती. आता घोषणेला दीड वर्ष झाले आहे, परंतु कर्जमाफीचा फायदा झालेला एकही शेतकरी मला भेटला नाही. तूर खरेदी व कांद्याच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने कोणतेही धोरण न ठेवल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कोणताही दिलासा राज्य सरकारने अद्यापपर्यंत दिलेला नाही. आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायला सुरुवात केली आहे. तरीही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडा' आंदोलन छेडण्याचे निर्देश स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

भाजपच्या सरकारांना राम मंदिर व हनुमानाच्या जातीची चिंता आहे, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता नाही, असे सांगून खासदार शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या धोरणावर टीका केली.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाआघाडी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालांना दीडपट भाव या मागण्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीरनाम्यात समावेश कराव्या, यासाठी प्रयत्न सुरू आहे. याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत.
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: Raju Shetty Talking to Fadnavis Government