राजूरवाडीतून शेतकरी कन्येचे राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शंकर चायरे यांनी जीवनयात्रा संपविली. आत्महत्येसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरले. मुख्यमंत्र्यांनी घरी भेट देऊन एक कोटीची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह नातेवाइकांकडून करण्यात आली. 

यवतमाळ : शेतकरी आत्महत्येची दखल मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने घेतली नाही. सरकारकडून संवाद साधण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे निषेधाचे पत्र राष्ट्रपती व राज्यपालांना शनिवारी (ता.14) राजूरवाडी (ता. घाटंजी) येथून पाठविण्यात आले. 

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शंकर चायरे यांनी जीवनयात्रा संपविली. आत्महत्येसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरले. मुख्यमंत्र्यांनी घरी भेट देऊन एक कोटीची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह नातेवाइकांकडून करण्यात आली. 

मात्र, सरकारकडून दखल घेण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. सरकारची संवदेना मृत झाल्याचा आरोप करण्यात आला. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून राष्ट्रपती व राज्यपालांना एक लाख पत्र पाठविण्यात येणार आहेत. पहिले पत्र शंकर चायरे यांची मोठी मुलगी जयश्री हिने पत्रपेटीत टाकले. पत्रात तीव्र भावना जयश्री हिने व्यक्त केल्या आहेत. सुकाणू समितीचे नेते रघुनाथ (दादा) पाटील यांनी राजूरवाडी येथे जाऊन चायरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन 50 हजारांची आर्थिक मदत दिली.

दिव्यांग शेतकरी दिलीप निखाडे यांनी या मोहिमेत सहभागी होऊन सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी सुकाणू समितीचे किशोर ढमाले, गणेश जगताप, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, कालिदास आपेट, गजानन पाचपोर, साहेबराव पवार, वासुदेव राठोड, गजानन पातोडे, श्रावण देठे, विनोद मडावी, शंकर येलादी आदींसह ग्रामस्थांनी निषेधाचे पत्र टाकले.

Web Title: Rajurwadi Farmer Daughter Send Letter to PM And Governor