मास्टरमॉइंड आतेभाऊच निघाला मामेभावाचा खुनी...लोधीटोल्यात घडली घटना

file photo
file photo

तिरोडा (जि. गोंदिया) : तिरोडा नगर परिषद हद्दीतील लोधीटोला येथे रविवारी (ता. 17) रात्री राकेश शोभेलाल दुधबुरे (वय 25) याचा खून करण्यात आला होता. त्या खुनाचा आरोपी राकेशचा शेजारी राहणारा सख्खा आतेभाऊच निघाला. या आरोपीला अवघ्या 24 तासांत तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.


रविवारी रात्री 9 च्या सुमारास जेवण झाल्यावर राकेश लोधीटोला-विहीरगाव रस्त्यावर असलेल्या नाल्यात शौचास जात असल्याचे लहान भावाला सांगून गेला होता. नाल्याजवळच्या पुलावर बसला असता राकेशच्या मागावर असलेले आरोपी संजय घनश्‍याम पटले (वय 27) हा आतेभाऊ व विलास रामकृष्ण तुमसरे (वय 23) यांनी राकेशला नाल्याशेजारी गाठले.

लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण केल्याने राकेश बेशुद्ध झाला. त्यानंतर विलासने घरी येऊन सेंट्रिंग तार व हूक आणला. राकेशचे हात पाय सेंट्रिंग ताराने घट्ट बांधून तो मृत झाल्याची खात्री केली. नंतर मृतदेह पाण्यात फेकण्याची तयारी सुरू होती. परंतु, आरोपी संजयचा पाय मारताना लचकल्याने लोधीटोला येथील नाल्याच्या वरच्या भागात मृतदेह ठेवून ते घरी आले.

नाल्याजवळ आढळला मृतदेह

रात्री 11 वाजेपर्यंत राकेश घरी आला नाही, म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नाल्याजवळ मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव, पोलिस निरीक्षक उद्धव दमाडे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील, अमरसिंग वसावे, राधा लाटे, पोलिस नायक ज्ञानोबा श्रीरामे व इतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरून आरोपी पळाला

यावेळी पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील यांची नजर लंगडत असलेल्या आरोपी संजय घनश्‍याम पटले याच्यावर पडली. त्याला लंगडण्याचे कारण राहुल साबळे यांनी विचारले असता संजयने उलटसुलट उत्तर दिले. याचदरम्यान घटनास्थळी स्वानपथक येताच संजयने घटनास्थळावरून पोबारा केला. नेमकी हीच बाब हेरून राहुल साबळे यांनी अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली.

आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी

संजयने पोलिस ठाण्यात येताच दुसरा आरोपी विलास रामकृष्ण तुमसरे याचे नाव सांगून आम्ही दोघांनीही जमीन बटईच्या वादातून व मोटारसायकलची चाबी राकेशने हरविल्यामुळे खून केल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, या खुनामागे राकेशचे 28 तारखेला होणारे लग्न कारणीभूत असल्याची चर्चा गावात आहे. दरम्यान, बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com