जय श्रीरामच्या जयघोषात विदभार्ची पंढरी दुमदुमली

संजय सोनोने
रविवार, 25 मार्च 2018

पोलिस अधिकारी शाम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार डी. डी. ढाकणे काने  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथक शहरात तैनात करण्यात आले होते.  

शेगाव : "राम नामे रंगुनिया गेले भक्तीच्या सागरात माउलीचे दर्शन झाले संतनगरीत... काय सांगू सोहळा आनंद मावेना डोळा धन्य झाले मी रामाच्या नवमीत...' या रजनी कलाने यांच्या गाजलेल्या ओळीमध्ये रविवारी संतनगरी दुमदुमली. टाळमृदंगाचा गजर...ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष आणि तप्त उन्हाच्या झळा सोसूनही "गण गण गणात बोते'च्या मंत्रघोषात तल्लीन झालेले वारकरी... विदर्भाच्या पंढरीत असे दृश्‍य दिसत होते... निमित्त होते... रामनवमी उत्सवाचे..! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या रामनवमी उत्सवाच्या पावन सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तीन लाख भाविकांनी "श्रीं'च्या समाधीवर माथा टेकविला. 
               
श्रीसंत गजानन महाराजांनीच हयात असताना सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सवाला यावर्षी १२४  वर्ष पूर्ण झाले. संस्थानच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सवात संपूर्ण शेगाव राममय झाले होते. या उत्सवात १ हजार ४३५ भजनी दिंड्यांसह दोन लाख भक्तांनी सहभाग घेतला. श्रीसंत गजानन महाराज मंदिरात श्रीरामनवमी उत्सव २८ मार्च पासून सुरू झाला होता. या उत्सवात श्रीअध्यात्म रामायण स्वाहाकारास यागाची सकाळी दहा वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणार्हूती झाली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा यांच्यासह विश्वस्त मंडळींची उपस्थिती होती. सकाळी श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. १२ वाजता सनई चौघडा हरिनाम, टाळ्यांचा ध्वनी, गुलाबपुष्पाची उधळण करीत 124 वा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरासमोर रजत पाळण्यात श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला. दुपारी दोन वाजता श्रींचा पालखी सोहळा संतनगरीच्या परिक्रमेसाठी निघाला. 

या पालखी सोहळ्यात रथावर श्रीरामांची भव्य प्रतिमा होती. प्रारंभी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा केली. त्यानंतर श्रींच्या पालखीचे रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमेस प्रस्थान झाले. नाम विठोबाचे घ्यावे पाऊल पुढे पुढे टाकावे, असा अमृतमय अभंग गात वारकरीसह श्रींची पालखी प्रतिवर्षी ठरलेल्या मार्गाने नगर परिक्रमेसाठी निघाली. 

श्रीराम नवमी उत्सव निमित्ताने मंगळवारी संतनगरी शेगावात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. शहरात दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चौकाचौकात बंदोबस्त लावला होता. पोलिस अधिकारी शाम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार डी. डी. ढाकणे काने  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथक शहरात तैनात करण्यात आले होते.  

श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने मंगळवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो भजनी दिंड्यांसह सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती होती. श्रीराम जन्मोत्सवानंतर श्रींची गावातून गज, अश्‍व, मेणा, रथामधून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या दिंडी मिरवणुकीचे शहरात भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या दिंडी मिरवणुकीदरम्यान वारकर्‍यांना पालखी मार्गाने वारकर्‍यांना महाप्रसाद, थंड पाणी आणि सरबतची व्यवस्था करण्यात आली होती.  

नागपूरच्या 'टिमकी' ची वारकर्‍यांची हृदयस्पर्शी सेवा 
नागपूरच्या टिमकी येथील श्री गजानन सेवा समिती, शेगाव येथील गजानन भक्त मंडळ हे भक्तांच्या चरण सेवेपासून तर सतत तीन दिवस महाप्रसादाची व्यवस्था ते करतात. यावर्षी रामनवमी उत्सवात श्रीगजानन भक्त मंडळ टिमकी नागपूर येथील भक्तमंडळी आत्मीयतेने भक्तांच्या चप्पल-जोडे ठेवण्याची मंदिराजवळ व संतनगरीतील प्रमुख मार्गावर विनामूल्य चप्पल स्टँड सेवा त्यांनी दिली.

Web Title: Ram navami News Pandhari Full by Crowd Vidarbh