रामजी की लीला है न्यारी... उपराजधानीत सलोखा कायम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

रविवारी शहरात क्रिकेट सामना आणि मुस्लिम बांधवाचा ईद-ए-मिलाद सण आहे. त्यामुळे शहरात रविवारीही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. 

नागपूर : अयोध्योतील रामजन्मभूमीचा निकाल येणार असल्याने शहरात सकाळपासून धाकधूक होती. केव्हा काय होईल हे सांगता येत नसल्याने पोलिसही तणावात होते. मात्र नागपूरकरांनी संयम राखला. कोणाच्याही भावना दुखावू दिल्या नाहीत. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाने सामंजस्य व एकोपा कायम ठेवून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन केले. 

रामजन्मभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच कुणीही रॅली किंवा जल्लोष करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्नही केला नाही. पोलिस आयुक्‍तांनी नुकत्याच घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीमुळे हे सर्व शक्‍य झाल्याची चर्चा शहरात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेला नागपूरकरांनी "सॅल्यूट' केला आहे. 

शुक्रवारीच निकाल जाहीर होणार असल्याचे कळल्याने पोलिस विभागाने सायंकाळपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सूत्रे हातात घेतली. पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नुकतीच शुक्रवारी तलावाजवळील राजवाडा पॅलेसमध्ये शांतता समितीची बैठक घेतली होती. त्यामध्ये पोलिस आयुक्‍तांनी सर्व धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. शनिवारी सकाळी आठ वाजतापासून नागपूर पोलिस कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात होते. शहरातील संवेदनशील भागात सशस्त्र पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच साध्या वेशात महिला व पुरुष कर्मचारी गस्त घालत होते. शहरातील अनेक भागात पोलिस कर्मचारी सार्वजनिक व्यवस्थेचा आढावा तसेच नागरिकांमध्ये असलेल्या चर्चेचा कानोसा घेत होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा भूमिका महत्त्वाची होती. 

चोवीस तास ऑनड्यूटी 
शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस कर्मचारी आज सकाळी आठ वाजतपासून तैनात होते. जेवण, नाश्‍ता आणि पाणी यांची व्यवस्था नसतानाही पोलिस कर्मचारी चोवीस तास ऑनड्यूटी होते. केवळ कर्मचारीच नव्हे तर पोलिस अधिकारीही रस्त्यावर तैनात होते. त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सकाळपासून ते रात्रीपर्यंत रस्त्यावर तैनात
सामाजिक शांतता ठेवण्यासाठी नागपूरकर पोलिसांना नेहमीच सहकार्य करतात. उपराजधानीतील वातावरण नेहमीच पोषक असते. प्रत्येक पोलिस कर्मचारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात होता. सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram temple, supreme court, nagpur