हवाला व्यापारातून रामानी यांची चित्रपटात गुंतवणूक

हवाला व्यापारातून रामानी यांची चित्रपटात गुंतवणूक

नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या कॉमेडी चित्रपटाच्या निमिर्तीसाठी विनोद रामानी यांनी हवालाकांडातून कोट्यवधींची रक्‍कम घेतली होती. मात्र, डॉन छोटा शकीलच्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. त्यामुळे रामानी यांच्यावर जवळपास 75 कोटींचे कर्ज झाले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. उपराजधानीतील नामांकित औषध व्यापारी विनोद रामानी यांनी तीन दिवसांपूर्वी घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती. तीन दिवसांनंतर त्यांचा कुजलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला होता. शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाइकांच्या उपस्थितीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामानी यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, रामानी यांच्यावर जवळपास 75 कोटींच्या कर्जाचा बोजा असल्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी तहसील पोलिस तपास करीत असून आज त्यांनी रामानी यांच्या घराची झडती घेतली. विनोद रामानी यांचे दोन्ही मोबाईल घरातून गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आत्महत्येपूर्वी मोबाईल कुठे ठेवले? किंवा मोबाईलचे काय केले? हा प्रश्‍न अनुत्तरित असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रामानी हे नशेचे इंजेक्‍शन घेत होते का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. विनोद रामानी यांना चित्रपटात अभिनय करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी दोन सिंधी भाषेतील चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळीने हिंदी चित्रपटात हात आजमावण्यासाठी प्रोत्साहित केले. ऍक्‍टिंगची आवड आणि मित्रांमुळे त्यांनी दिग्दर्शक विशाल मिश्रा यांच्या दिग्दर्शनात "कॉफी विथ डी' हा कॉमेडी चित्रपट बनविला. हवाला व्यापारात दिलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी व्यावसायिक गुन्हेगारांचा वापर करतात. पैसे बुडविण्याची कुणीही हिंमत करीत नाही. हवाला कांडातील गुन्हेगारांनी त्यांना धमक्‍या दिल्या आणि तसेच अन्य खासगी सावकारांनीही पैशासाठी दमदाटी केली होती. त्यामुळेच कंटाळून रामानी यांनी जीवनयात्रा संपविल्याची माहिती सूत्रांनी दिली. तहसील पोलिसांना रामानी यांचे दोनही मोबाईल आढळून आले नाहीत. पोलिसांनी रामानी यांच्या दोन्ही क्रमांकांचा सीडीआर काढण्याची तयारी केली आहे. रामानी यांना कुणी फोन केले? कुणी मेसेज पाठविले? किंवा रामानी यांनी कुणाला फोन केले? याचा डेटा पोलिस काढणार आहेत. त्यामुळे दमदाटी करणारे अवैध सावकार आणि पैशाच्या वसुलीसाठी धमकी देणारे पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com