हॅलो सर, तुम्ही ‘इन्स्पेक्‍टर’ ना?

Ramesh-Bhatkar
Ramesh-Bhatkar

नागपूर - रमेश भाटकर सीताबर्डी मेनरोडने फिरत आहेत आणि एकानेही त्यांना थांबविले नाही, कुणी बोलायची हिंमत केली नाही. हॉटेल गणराजमधून पायी चालत निघाले आणि व्हेरायटी चौकापर्यंत जाऊन चहा पिऊन परत आले. पण, फक्त एका चाहत्याने त्यांना आवाज दिला ‘हॅलो सर... तुम्ही इन्स्पेक्‍टर ना?’. भाटकर थांबतात आणि त्या चाहत्याशी बोलून पुन्हा हॉटेलकडे वळतात.

रमेश भाटकर यांचा भारदस्त आवाज आणि त्यांचे ताठ मानेने चालणे या दोन गोष्टींचा दरारा म्हणा किंवा त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे दडपण म्हणा कुणीही त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे आले नाही. पण, त्याचे त्यांना दुःख झाले नाही. ‘एवढा फिरून आलो, पण एक जण वगळता कुणीही माझ्याजवळ आले नाही. त्यामुळे ‘सेलिब्रिटी’सारखे मुळीच वाटले नाही आणि छान मोकळा फिरू शकलो’, अशी भावना त्यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली होती. रमेश भाटकर हातात एक पाण्याची बॉटल घेऊन फेरफटका मारला आणि एका ठिकाणी चहाही घेतला. सारे त्यांच्याकडे बघत होते. पण, खरच रमेश भाटकर इथे एका टपरीवर चहा पिणार आहे का, अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. तर काहींची भाटकरांना आवाज देण्याचीच हिंमत झाली नव्हती. 

‘ययाती, देवयानी’ या संगीत नाटकाच्या प्रयोगासाठी जुलै २०११ मध्ये रमेश भाटकर नागपुरात आले  होते. त्यावेळचा हा किस्सा. त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीतील हे पहिले संगीत नाटक होते, हे विशेष. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचे काही प्रयोग झाले होते. नागपूरकर प्रेक्षक सुजाण आहेत. नाटकात काम करणारा नट कितीही मोठा असो, त्यांना नाटक आवडले  तरच ते डोक्‍यावर घेतात, असे ते म्हणायचे.

झाडीपट्टीतही रमले
रमेश भाटकर यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर बरेच काम केले. विविध नाटकांचे दीडशेहून अधिक प्रयोग त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले. जय दुर्गा नाट्य रंगभूमी, साई नाट्य रंगभूमी आदींसाठी त्यांनी काम केले. ‘पाझर’, ‘आक्रोश भारत मातेचा’, ‘पैसा’, ‘छळ’, ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘वादळ’ आदी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. ‘झाडीपट्टीत काम करताना मी भरपूर आनंद  घेतो. तिथले वातावरण, कलावंतांना लाभलेला रसिकाश्रय, सभ्यता या सर्व गोष्टी बघून हेवा वाटतो. झाडीपट्टीत काम करतानाही मी माझी स्टाइल सोडलेली नाही. आपण जसे आहोत, तसेच लोकांपुढे जायला हवे’, असेही ते ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com