आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. रामकृष्णदादा यांच्या निधनाने राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात घडलेला अंतिम दुवा निखळला आहे.

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. रामकृष्णदादा यांच्या निधनाने राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात घडलेला अंतिम दुवा निखळला आहे.
रामकृष्णदादा यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 11) दुपारी 12 वाजता तळेगाव (श्‍यामजीपंत) ता. आष्टी, जि. वर्धा येथील मानव विकास ज्ञानसाधनाश्रम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज त्यांचे पार्थिव श्रीक्षेत्र वरखेड (जि. अमरावती) या मूळ गावी नेण्यात आले.
अल्प परिचय
वरखेड हे रामकृष्णदादा यांचे मूळ गाव. ते राष्ट्रसंतांच्या मामांचेही गाव. तिथे राष्ट्रसंतांची व्यायामशाळा होती. दादांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. वरखेडमध्येच वयाच्या बाराव्या वर्षी ते राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात आले. पुढे राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित होऊन दादा राष्ट्रसंतांसोबतच राहू लागले. नंतर दादांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी गावोगावी झंझावाती प्रवास केला. ग्रामगीता 1955 ला प्रकाशित झाली. पण, रामकृष्णदादांनी त्याअगोदरच 1953 पासून ग्रामगीतेवर प्रवचनास सुरुवात केली होती. ग्रामगीतेच्या प्रवचनाकरिता दादांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात पिंजून काढला. आपल्या अमृततुल्य वाणीतून त्यांनी तब्बल 62 वर्षे ग्रामगीतेवर हजारो प्रवचन दिले.
दादांनी एकूण 90 पुस्तके लिहिलीत. असंख्य पुस्तकांना प्रस्तावना दिली. विविध कंपन्यांनी ग्रामगीतेवर त्यांच्या अनेक ध्वनिफिती प्रकाशित केल्या. श्रीगुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. श्रीमाणिक प्रकाशन, श्रीमाणिक वाचनालय, ग्रामगीता संदेश पाक्षिकाची निर्मिती, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मानव विकास ज्ञान साधनाश्रमाची त्यांनी स्थापना केली. विदर्भातील 25 पेक्षा अधिक संस्थांमध्ये ते विविध पदांवर अखेरपर्यंत कार्यरत होते. रामकृष्णदादांना ग्राममहर्षी पुरस्कार, कविवर्य दे. ग. सोटे ग्रामीण साहित्य पुरस्कार, व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार (भोसले प्रतिष्ठान), मा. सा. कन्नमवार स्मृती साहित्य पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार (मुंबई प्रतिष्ठान), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
दिमाग की कुस्ती लढ...
राष्ट्रसंत एकवेळ त्यांना म्हणाले, "रामकृष्ण अब तू कुस्ती छोड दे, दिमाग की कुस्ती लढते जा.' तेव्हापासून राष्ट्रसंतांनी तयार केलेले साहित्य, ग्रामगीता यांचे वाचन त्यांनी केले. ग्रामगीता जसजसी लिहिली जात होती, तस तशी तिचे वाचन रामकृष्णदादा यांनी केले. रामकृष्णदादा ग्रामगीतेचे तज्ज्ञच झाले. त्यांचे ते प्रावीण्य पाहून एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचे कौतुक केले व सांगितले की, ""आता तू होईल तेवढी ग्रामगीता सांगत जा. ग्रामगीतेत सर्व वेद-शास्त्रांचे सार आले आहे. तू ग्रामगीता प्रवचनाची बोली करू नको आणि बुवाबाजी करू नको.'' रामकृष्णदादांनी त्यांचा सल्ला अखेरपर्यंत पाळला. त्यांच्या ग्रामगीतेवरील प्रवचनाचे महात्म्य ओळखून खुद्द राष्ट्रसंतांनी त्यांना ग्रामगीताचार्य असे संबोधले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramkrushnadada belurkar passes away