रामटेकला मिळाले होते 13 ऑगस्टला स्वातंत्र्य

file photo
file photo

रामटेक (जि. नागपूर) : स्वातंत्र्यवीरांनी 13 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण रामटेक तालुक्‍याला एक दिवसाचे स्वातंत्र्य मिळवून दिले होते. रामटेकच्या स्वातंत्र्यवीरांनी रामटेकच्या इतिहासात एक सोनेरी पान आपल्या नावे लिहिले आहे. त्याची आठवण सदैव रामटेकवासींच्या मनात साठविली आहे.महात्मा गांधींनी 1942 मध्ये "भारत छोडो' आंदोलन छेडले होते. रामटेक त्याला अपवाद नव्हते. शहराच्या गांधी चौकात यानिमित्त मोठी सभा झाली. रामटेकच्या स्वातंत्र्यवीरांनी महात्मा गांधींचा "करू किंवा मरू' हा संदेश कृतीत उतरविण्याचा निर्धार केला. 12 ऑगस्ट 1942 रोजी जाहीर भाषणाद्वारे लोकांना उत्पाती चळवळ करण्याची चिथावणी दिल्याचे कारण पुढे करून इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर बकारामजी उराडे, सूरजलाल गुप्ता, हरी शिवराम शेंडे (हरी पिताजी) यांना अटक केली. 13 ऑगस्टला त्यांना नागपूरला घेऊन जाण्याकरिता मातापूरकर हे सबइन्स्पेक्‍टर व चार पोलिस आले. स्वातंत्र्यतवीरांना हातकडी घालून सकाळी रेल्वे स्टेशनकडे घेऊन जात असताना शंकरराव कटकमवार, झिंगरजी परतिते, छन्नू लक्ष्मण बिसमोगरे, सीताराम हेडाऊ, महादेवराव वलोकर, मोरबाजी बिसन यासह 150 स्वातंत्र्यवीर हाती तिरंगा घेऊन जयघोष पोहचले. रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर त्यांनी पोलिसांना घेरले. त्यांच्याजवळील शस्त्रे हिसकाविली, सरकारी पोशाख उतरवून खादीची वस्रे परिधान करावयास बाध्य केले. तिघाही स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या तावडीतून मुक्त केले. रेल्वे स्टेशनवर आलेले नायब तहसीलदार जालमसिंग व सबइन्स्पेक्‍टर मिश्रा यांनाही खादीचे कपडे घालून त्यांच्या हाती तिरंगा दिला.अधिकाऱ्यांना घेऊन रामटेक शहरातील तहसील कार्यालयाजवळ पोहचलेले स्वातंत्र्यवीर व पोलिस समोरासमोर उभे ठाकले. तहसीलदार हरकरे यांचीही गोळीबाराचे आदेश देण्याची हिंमत नव्हती. संधी साधून हरी शिवराम शेंडे यांनी कचेरीच्या छपरावरील युनियन जॅक काढून त्या जागी तिरंगा फडकाविला. त्यावेळी एकच जयघोष झाला. रामटेक तालुका ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. स्वातंत्र्याची ग्वाही फिरवण्यात आली. तालुक्‍यावर स्वातंत्र्यवीरांचा ताबा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com