रामझुल्याचे लोकार्पण जूनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर - स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूरची घोडदौड सुरू आहे. विविध विकासकामांसोबत नागपूरच्या विकासाच्या ‘रोडमॅप’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल जूनच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत असून, पुलाचा बारा वर्षांचा वनवास लवकर संपणार आहे.  

नागपूर - स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूरची घोडदौड सुरू आहे. विविध विकासकामांसोबत नागपूरच्या विकासाच्या ‘रोडमॅप’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल जूनच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत असून, पुलाचा बारा वर्षांचा वनवास लवकर संपणार आहे.  

उपराजधानीच्या वैभवात भर टाकणाऱ्या रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे तीन वर्षांपूर्वी लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला गती देण्यात आली. दोन वर्षांत या पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत ही गती अधिक आहे. सध्या सदरकडील भागातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भंडारा मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. मधल्या काळात मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अडथळ्यामुळे या कामाचा वेग मंदावला होता. आता मात्र त्या कामाला गती मिळाली आहे. सदरकडील पुलाचे काम पूर्ण होताच रामझुल्यावरील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात होईल. 

पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा वेग अधिक असून, या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. 

प्रारंभी ४५ कोटींचा असलेला हा प्रकल्प आता ६९ कोटींवर गेला आहे. या पुलांवरील डांबरीकरण उत्तम दर्जाचे राहणार असल्याने वारंवार डागडुजीची गरज भासणार नाही. रामझुल्याचे बांधकाम ऑफकॉन कंपनी करीत आहे. या कंपनीने यापूर्वी बेंगळुरू व कोटा येथेही असेच केबल टाकलेल्या उड्डाणपुलांचे काम केले आहे. या दोन्ही शहरांच्या तुलनेत नागपुरातील रामझुला तांत्रिकदृष्ट्या अधिक अत्याधुनिक आहे. 

वाहतूक व्यवस्था सुधारणार
दोन्ही रामझुल्यांत १०० पेक्षा अधिक केबल आहेत. एकाच पिलरवर हा पूल उभा असून, दोन्ही भागांनी केबलने बांधला आहे. केबलला ऑयलिंग केल्यानंतर ते मोठ्या नटबोल्टने बंद केले जातात. साधारणतः ५० वर्षे या केबलला पुन्हा ऑयलिंग करण्याची गरज नसल्याचे सांगितले जाते. पुलाशेजारी फुटपाथही तयार केला आहे. दुसरा टप्पा तीनपदरी आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम झाल्यानंतर दोन्ही मार्गांनी सुरू होणाऱ्या वाहतुकीने या भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. 

Web Title: Ramzula Opening in June