"रान'बोडी झालं आबादानी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित गावठाणात वनविभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे गावकऱ्यांमध्येही आनंद आणि समाधानाचा भाव आहे.
जून 2012 मध्ये उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची घोषणा झाली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भंडाऱ्यातील पवनीचा एकूण 189. 30 चौरसकिलो मीटरचे क्षेत्र अभयारण्यात समाविष्ट आहे. या विस्तीर्ण अभयारण्यात कुही तालुक्‍यात येणार रानबोडी हे एकमेव गाव होते. यामुळे सतत वन्यप्राण्यांचा धोका होता. गावकऱ्यांनी योग्य मोबदला मिळाल्यास अभयारण्यातून बाहेर पडण्याची तयारी दाखवली. कायदेशीर प्रक्रियेनुसार उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सप्टेंबर 2013 मध्ये चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यात गावाच्या अधिग्रहणाची शिफारस होती. पुनर्वसन कायदा 2012 अंतर्गत प्रतिकुटुंब 10 लाखांचे एकमुस्त पॅकेज देय होता. तर 2015 च्या कायद्यानुसार मालमत्तेचे मोजमाप करून मोबदला देय होता. वनविभागाने पुढाकार घेत ग्रामस्थांना दोन्ही कायद्यांनुसार मोबदला देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. गावात एकूण 248 घरे आणि 265 पात्र कुटुंब होते. गाव सोडण्यापूर्वी प्रतिलाभार्थी 1 लाख तर गाव सोडताच 4 लाखांचे धनादेश देण्यात आले. उर्वरित पाच लाख फिक्‍स डिपॉझिट स्वरूपात देण्यात आले. याशिवाय गावठाणातील संपत्तीला बाजार भावाच्या दुप्पट तर एकूण 235.16 हेक्‍टर शेतजमिनीला तब्बल आठपट दर देण्यात आला. प्रतिलाभार्थी कुटुंबाला 14 ते 8 कोटींपर्यंत मोबदला मिळाला. विशेष बाब म्हणून या प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला उमरेड शहरालगतच्या वनविभागाच्या जागेवर दीड हजार चौरस फुटाचे भूखंड देण्यात आले असून ग्रामस्थांनी या जागेवर स्वप्नातील घर साकारले आहे. सर्व गावकरी आनंद आणि गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पुनर्वसनाचा हा आदर्श नमुना म्हणून अन्य काही गावांमधील नागरिकसुद्धा अशाच पद्धतीने पुनर्वसनाची मागणी करून लागले आहेत.

मूळ गावाचा फिल पूनर्वसनाच्या जागेवरही
मूळ गावात घरांची रचना होती अगदी त्याच पद्धतीने पुनर्वसनाच्या जागेवरही गावकऱ्यांनी सर्वसंमतीने भूखंडांचे वाटप करून घेतले. म्हणजेच गावात जो ज्याचा शेजारी होता नवीन गावातही तोच शेजारी मिळाला. पुनर्वसित गाव उमरेड शहरालगत असले तरी एक भागाला जंगल लागून आहे. यामुळे जंगलाचाही फिल येथे आहे. विशेष म्हणजे गावाच्या विकासासाठी गावकरीच सरसावले. प्रत्येकी 2 लाखांचा निधी पायाभूत सुविधांसाठी दिला. ही रक्कम त्यांना परत मिळवून देण्याचे शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.

उद्योगाची कास
प्रकल्पग्रस्तांनी मिळालेल्या निधीची गुंतवणूक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केला आहे. अनेकांनी शेतीखरेदी केली आहे. तर युवकांनी उद्योगाची कास धरली आहे. प्रशांत मेश्राम या युवकाने ऍक्वा वॉटरचा व्यवसाय सुरू केला आहे. मोबाईल रिपेरिंग, ड्रायव्हिंगसह अन्य कौशल्य घेऊन युवक स्वयंरोजगाराकडे वळले आहेत. रमेश रोहनकर यांनी प्रास्पर क्रॉप सायंस प्राडक्‍ट नावाने सेंद्रिय कीटकनाशकांचे उत्पादन सुरू केले आहे. चालू वर्षात त्यांनी 40 लाखांची उलाढाल केली आहे.
वन्यप्रेमींकडून अभयारण्याला साद
वन्यजीव सप्ताहांतर्गत वनविभागातर्फे शनिवारी राणबोडी पुनर्वसन प्रकल्प व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य क्षेत्रात दौरा आयोजित करण्यात आला होता. विभागीय वनाधिकारी राहुल गवई, मोहन नाईकवाडे, सहायक वनसंरक्षक अजित साजणे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामदास निंबेकर, घनश्‍याम ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकूण 4 वाघिणी व एका वाघासह बिबट, हरीण, रानगवा व अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. वन्यप्रेमी व पर्यटकांना हे अभयारण्य साद घालत असून सातत्याने अभयारण्याकडे ओढा वाढत असल्याची माहिती गवई यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com