मनसेच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

असे आले प्रकरण उघडकीस 
सारिका यांनी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. त्यानंतर डीसीपी नीलेश भरणे यांनी स्वतः आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. सोमवारी सारिका यांनी देशपांडेला पैसे देण्याची तयारी दर्शविली. पैसे घेण्यासाठी जयेश अग्रेकर आणि क्रिष्णा इंगोले हे रविनगरात आले. पैशाचे पाकीट घेतल्यानंतर सारिका यांनी पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे समजते. 

अंबाझरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक केली असून गुरुवारपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्हॉट्‌सॲप कॉल करून २० लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी तीन लाख रुपये ताबडतोब माझ्या कार्यकर्त्यांना द्यावे असेही त्याने बजावल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. यापैकी ७० हजार आरोपींना दिले. उर्वरित रक्‍कम घेतेवेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. मनसेच्या पदाधिकाऱ्याचे नाव वापरून खंडणी मागण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या अमरावतीच्या असलेल्या सारिका रामकृष्ण कडू (वय ४०, उत्कर्ष-अनुराधा सोसायटी, सदर) या नागपुरातील शासकीय इमारत क्रमांक १ मध्ये असलेल्या भूमापन अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. या कार्यालयात काही कर्मचारी लाच घेऊन कामे करतात तसेच ‘सेटिंग’ करून गैरव्यवहार करतात. आरोपींनी भूमापन अधिकारी कार्यालयात जाऊन काही पुरावे गोळा केले. व्हिडिओ-फोटो तसेच काही कागदपत्रे बाहेर काढली. कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याची तयारी केली. त्यानंतर त्यांनी खंडणी मागण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आरोपी जयेश सुरेश आग्रेकर (वय ४०, इतवारी), क्रिष्णा वासुदेव इंगोले (वय २२, भरतवाडा) आणि संदीप वसंत देशपांडे या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले आहेत. जयेशचे इतवारी शहीद चौकात राज मेडिकल स्टोअर्स आहे.

अशी मागितली खंडणी
सारिका कडू यांना संदीप देशपांडे याने २ मे रोजी फोन केला. नंतर त्याने व्हॉट्‌सॲपवरून व्हिडिओ कॉल केला. त्याने कार्यालयातील भ्रष्टाचाराचे काही पुरावे असल्याचे सांगितले. त्याने काही कागदपत्रे त्यांना व्हॉट्‌सॲपही केले. त्यामुळे सारिका घाबरल्या. देशपांडेने तीन लाखांची मागणी केली. घाबरलेल्या सारिका यांनी होकार दिला.

कागदाच्या नोटा दिल्या!
पोलिसांनी सापळा रचून दोन लाख तीस हजार रुपयांचे बंडल तयार केले. वर आणि खाली दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवल्या. उर्वरित नोटेच्या आकाराचे तुकडे ठेवले. खंडणी स्वीकारताच दबा धरून असलेल्या पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

७० हजारांचा पहिला हप्ता
सारिका यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविताच देशपांडे यांनी क्रिष्णा इंगोले याला दुचाकीने रविनगर चौकात जाण्यास सांगितले. तेथे सारिका यांनी पहिला टप्पा म्हणून ७० हजारांचे पहिले पाकीट क्रिष्णा याला दिले. त्याने ते पैसे मेडिकल स्टोअर्सचा मालक आरोपी जयेश सुरेश अग्रेकर याला दिले. त्यानंतर देशपांडेने उर्वरित पैशासाठी फोनवरून त्रस्त केले.

Web Title: Ransom offense to the MNS office bearer Crime