
शहरातील दत्तापूर भागातील एका सहा वर्षीय चिमुकलीवर युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. सात) उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून विविध कलमान्वये दत्तापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : आजच निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची घोषणा झाली आणि न्याय मिळाल्याचे समाधान वाटत नाही, तोच पुन्हा अशाच घटनेने मन हेलावले. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. विकृत मनोवृत्तीची ही माणसे कोवळ्या बालिकांनाही सोडत नाहीत. यापेक्षा दुर्दैव ते काय?
महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रणिताच्या हत्येला अवघे 24 तासही उलटले नसताना शहरातील दत्तापूर भागातील एका सहा वर्षीय चिमुकलीवर युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. सात) उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून विविध कलमान्वये दत्तापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा - निघाल्या तलवारी आणि झाले सपासप वार
दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नगरात आपल्या सहा वर्षीय मुलीसोबत एक महिला तीन वर्षांपासून माहेरी राहते. मंगळवारी (ता. सात) सकाळी ती मुलीला आंघोळीला नेत असताना तिच्या अंतर्वस्त्राला रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे मुलीची विचारपूस केली असता सोमवारी (ता. सहा) हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले. मुलीने आईला सांगितल्यानुसार सोमवारी (ता. सहा) दुपारच्या दरम्यान संशयित नागेश नंदलाल कुरील (वय 21) याने मुलीला मोबाईल दाखवतो, असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मंगळवारी (ता. सात) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
बाललैंगिक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल
स्थानिक लोकांचा जमाव पोलिस ठाण्यावर धडकला. दत्तापूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत लगेच संशयिताला शिताफीने अटक करून त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नागेश कुरील याला बुधवारी (ता. आठ) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी अधिक तपास दत्तापूर पोलिस करीत आहेत.