अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

अवघ्या दहा वर्षांची चिमुकली घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना तालुक्‍यातील नरसाळा शिवारातील एका गिट्टी क्रेशरवर शनिवारी (ता.11) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मारेगाव (जि. यवतमाळ) - अवघ्या दहा वर्षांची चिमुकली घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना तालुक्‍यातील नरसाळा शिवारातील एका गिट्टी क्रेशरवर शनिवारी (ता.11) दुपारी दोनच्या सुमारास घडली. यातील संशयित अत्याचाऱ्याला पोलिसांनी रविवारी (ता.12) अटक केली. मात्र, प्रारंभी अत्याचार पीडितेची तक्रार न घेता त्यांना परतवून लावणाऱ्या मारेगाव पोलिस ठाण्यातील संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

शेषराव शंकर शिंदे (वय 24, रा. नरसाळा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. नरसाळा येथे गौणखनिजाचे कारखाने आहेत. यापैकी एका गिट्टी क्रेशरवर छत्तीसगड येथील मजूर कामाला आहेत. या कामगाराची अल्पवयीन मुलगी झोपडीत एकटीच असल्याचे पाहून संशयित ट्रॅक्‍टरचालक शेषरावने पाणी मागण्याचा बहाणा करून झोपडीत प्रवेश केला. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती कळताच तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. पीडितेसह तिचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात गेले असता, तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अदखलपात्र स्वरूपाची तक्रार घेऊन परतवून लावण्यात आले. त्यानंतर पीडिता घरी गेली. रात्री मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला यवतमाळच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेव्हा मध्यरात्री पीडितेला यवतामाळ येथे शासकीय रुग्णालयात हलविले. तिच्या कुटुंबीयांनी त्यांची कैफियत यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यापुढे मांडली. त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठून पीडितेची भेट घेतली. प्रकरण लक्षात घेऊन मारेगाव पोलिसांना कारवाईचे आदेश दिलेत. अखेर रविवारी (ता. 12) या प्रकरणात मारेगाव पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली आहे. संबंधित पोलिसांच्या या हलगर्जी कारभारामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी सांगितले.

Web Title: Rape accused arrested