गुंगीचे औषध पाजून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

आईच्या पायाखालची वाळू सरकली
सोनालीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. सुरवातीला आईने दुर्लक्ष केले. मात्र, सलग दोन दिवसांपासून पोटात दुखत असल्याचे सांगितल्यामुळे तिला डॉक्‍टरकडे नेण्यात आले. डॉक्‍टरांनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आईला दिली. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. आईने आस्थेने विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

१६ वर्षांची मुलगी दोन महिन्यांची गर्भवती; आरोपीला अटक 
नागपूर - कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगीचे औषध टाकून नशेत असलेल्या १६ वर्षीय मुलीवर ४५ वर्षीय व्यक्‍तीने तीनदा बलात्कार केला. ती मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनीष निळकंठ गेडाम (वय ४५, रा. जागृतनगर, चांदणी बारमागे, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सोनाली (बदललेले नाव) ही जरीपटक्‍यातील सुगतनगरात राहते. तिचे वडील एका नामांकित कुरिअर कंपनीत कामाला आहेत. ती बारावीत आहे. आरोपी मनीष गेडाम हा विवाहित असून तो सकाळी पेपर वितरित करतो. तो सोनालीच्या वडिलाचा मित्र आहे. त्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे-जाणे होते. त्याची वाईट नजर सोनालीवर होती.

१६ जानेवारीला सकाळी अकराला सोनालीचे आईवडील कामाला गेले असताना आरोपी मनीष घरी आला. त्याने हातात नाश्‍त्याचे पाकीट आणले. सोनालीला खायला दिले. काही वेळातच तिला गुंगी आली. ती नशेत असतानाच मनीषने तिला ओरबडायला सुरवात केली. ती बेशुद्ध असताना बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला प्रकार कळला. तिने रडण्यास सुरवात केली. मनीषने तिला वस्तीत बदनामी करण्याची धमकी देऊन गप्प केले. १७ फेब्रुवारीला पुन्हा तो कुणी नसल्याची संधी साधून घरी आला. त्याने बळजबरीने तिला ज्यूस पिण्यास दिले. त्यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारीला दुपारी घरी आल्यानंतर त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देताच तिला मारहाण आणि बदनाम करण्याची धमकी दिली.

मुलीचे आरोपीशी मैत्रिपूर्ण संबंध असल्याची माहिती आहे. ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
- पराग पोटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जरीपटका 

Web Title: Rape Crime