साखरपुड्यानंतर भावी पत्नीवर बलात्कार 

अनिल कांबळे
गुरुवार, 24 मे 2018

युवतीच्या तक्रारीवरून भावी पती व त्याच्या आईविरूद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशिष हरिभाऊ मेश्राम (वय 26) आणि रत्नमाला हरिभाऊ मेश्राम (वय 55) अशी आरोपींची नावे आहेत. 
 

नागपूर - रेल्वेत स्टेशन व्यवस्थापक असलेल्या युवकाने साखरपुडा झाल्यानंतर भावी पत्नीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पाच लाख रूपये हुंड्याची मागणी करीत लग्नास नकार दिला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून भावी पती व त्याच्या आईविरूद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशिष हरिभाऊ मेश्राम (वय 26) आणि रत्नमाला हरिभाऊ मेश्राम (वय 55) अशी आरोपींची नावे आहेत. 

आशिष मेश्राम हा गुजरातमध्ये रेल्वेत स्टेशन व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तो जरीपटक्‍यातील नारा रोडवर राहणाऱ्या वृंदा (बदललेले नाव) या 25 वर्षीय उच्चशिक्षित युवतीला बघायला आला होता. मुला-मुलींची पसंती ठरविल्यानंतर साखरपुड्याची तारीख ठरली. 2017 मध्ये दिवाळीच्या सुटीत आशिष आणि वृंदा यांचे रितीरीवाजाप्रमाणे साखरपुडा झाला. या कार्यक्रमासाठी वृंदाच्या आईवडीलांनी सोन्याची अंगठी आशिषला दिली. त्यानंतर 25 डिसेंबर 2017 ला लग्नाची तारीख ठरली. वृंदा आणि आशिष यांच्याकडील नातेवाईकांपर्यंत लग्नाच्या पत्रिका पोहचल्या. वृद्धाच्या वडीलाने लग्नाची तयारी केली. लग्नाचा हॉल बुक करणे तसेच धान्य, कपडे खरेदी झाली. मात्र, आशिषने रेल्वे विभागाकडून सुटी मंजूर न झाल्याचा बहाणा करीत लग्न पुढे ढकलण्याची विनंती केली. दोन्ही कुटूंबियांना बैठक घेऊन लग्न 30 मे 2018 ला करण्याचे ठरविले. यादरम्यान, आशिषने वृंदाशी मोबाईलवरून संपर्क साधून भेट घेतली. त्यानंतर तिला फिरायला नेऊन तिला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. तिने नकार देताच लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतर आशिषने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

लग्नाची तारीख जवळ येत असनात आशिषची आई रत्नमाला हरिभाऊ मेश्राम हिने वृंदाच्या वडीलाकडे हुंड्याची मागणी केली. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च म्हणून पाच लाख रूपये मागितले. पैसे न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली. वृंदाच्या वडीलाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी लग्न न मोडण्याची विनंती केली. मात्र, आशिषने 5 मे 2018 रोजी फोन करून लग्न मोडल्याचे सांगितले. या प्रकरणी वृंदाने जरीपटका पोलिस ठाण्यात आशिषविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: rape on a future wife after the engagement