गुंगीचे औषध देऊन वर्गमैत्रिणीवर बलात्कार 

अनिल कांबळे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

वर्गमैत्रिणीला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर मित्राने बलात्कार केला. शारीरिक संबंधाची मोबाईलने क्‍लिप बनवून तसेच फोटो काढून वॉट्‌सऍपवर व्हायरल केले.

नागपूर : वर्गमैत्रिणीला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर मित्राने बलात्कार केला. शारीरिक संबंधाची मोबाईलने क्‍लिप बनवून तसेच फोटो काढून वॉट्‌सऍपवर व्हायरल केले. ही धक्कादायक घटना लकडगंज परीसरात घडली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके (वय 21 रा. गरोबा मैदान, हरीहर नगर) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि पीडित 18 वर्षीय युवती हे दोघेही एकाच महाविद्यालयात बीसीसीएचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात दोघांची ओळख झाली. सतीशने तिला प्रेमजाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवले. ती आमिषाला बळी पडली. 2 जुलैला आरोपीने पीडितेला कुटुंबियांची ओळख करुन देतो म्हणून घरी बोलावले. ती घरी पोहचल्यानंतर घरात कुणी नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने आई बाहेर गेल्याचे सांगून थोडावेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि फोटो आणि व्हिडीओ क्‍लिप काढली. या फोटो आणि व्हिडीओच्या आधारे आरोपी तिला ब्लॅकमेल करु लागला आणि वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला.

सतत महिनाभर सतीशच्या लैंगिक अत्याचाराला ती बळी पडली. 1 ऑगस्टला त्याने एका मित्राशी ओळख करून देण्यासाठी तिला बोलावले. मात्र, सतीशचा इरादा ओळखून तिने सतीशला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सतीशने तिला घरी जाऊन मारहाण केली. मात्र धमकी आणि मारहाणीनंतरही ती मनमानी करू देत नसल्याचे पाहून सतीशने तिची बदनामी करण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ महाविद्यालयातील वॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच महाविद्यालयाच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल झालेले पीडितेचे फोटो पुढे व्हायरल करू नये, अन्या त्या विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी इशारा लकडगंज पोलिसांनी दिला.

Web Title: raped on classmate and video photo viral on social media