पोलिसांच्या नाकावर टिच्चून नागपूरातील तरुणाई बेफाम

अनिल कांबळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

नागपूर : शहरातील सर्वच चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे. असे असूनही तरुणाई बेफाम होऊन वाहन चालवीत आहे. "रॅश ड्रायव्हिंग' आणि सिग्नल तोडणाऱ्यांमध्ये युवकांचा सर्वाधिक समावेश आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची "खाऊगिरी' जबाबदार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. याबाबत वेळीच गांभीर्य न दाखविल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : शहरातील सर्वच चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे. असे असूनही तरुणाई बेफाम होऊन वाहन चालवीत आहे. "रॅश ड्रायव्हिंग' आणि सिग्नल तोडणाऱ्यांमध्ये युवकांचा सर्वाधिक समावेश आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची "खाऊगिरी' जबाबदार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. याबाबत वेळीच गांभीर्य न दाखविल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.

शहरात अपघातांच्या प्रमाणावर सध्या अंकुश लागला आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ आणि उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी उपाययोजना करून स्वतः मॉनिटरिंग केले. डॉ. वेंकटेशम्‌ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्याने शहरात मेट्रोची कामे सुरू असताना वाहतुकीची समस्या निर्माण होत नाही. परंतु, वाहतूक शाखेतील काही अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या "खाऊगिरी' स्वभावामुळे वाहतूक व्यवस्था बिघडत आहे. सीताबर्डी, धंतोली आणि धरमपेठेसह फुटाळा परिसरात युवा वर्ग वाहतूक पोलिसांना जुमानत नाही.

वाहतूक पोलिसांनी अनेक हॉटेल चालकांना रस्त्यावर ग्राहकांच्या दुचाकी ठेवण्यास "अर्थपूर्ण' परवानगी दिली आहे. तसेच पोलिस वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नव्हे, तर चौकडी बनवून वाहनचालकांची पिळवणूक करण्यासाठी रस्त्यावर उभे असतात. चौकात पोलिस दिसत नाही. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सिग्नल तोडल्यास चिरीमिरी देऊन सुटका होते, असे सत्य बाहेर आल्याने पोलिसांचा वचक नाही. तरुणींना पकडल्यानंतर "सॉरी सर' म्हणून पोलिसांना "मामा' बनविले जाते.

मलिदा लाटण्याला प्राधान्य
अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिसल्यास पालकांवर कारवाई होते. मात्र, नागपूर वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत एकाही पालकाची साधी समजूत घातली नाही. उलट, अल्पवयीन दिसल्यास भीती दाखवून "मलिदा' लाटण्याचा प्रकार घडताना दिसतो. शाळकरी मुलामुलींकडे परवाना नसतो. ही संधी साधून वाहतूक पोलिस त्यांना अडवतात. पालकांचा मोबाईल नंबर मागतात. त्यामुळे घाबरून मुले पैसे देत असल्याचे समजते.

पावती फाडण्याची धमकी
शहरात तरुणाई ट्रिपल सीट सुसाट वाहन चालविताना दिसते. प्रत्येक चौकात पोलिस असल्यानंतरही सिग्नल जम्प केले जातात. वाहतूक पोलिस झाडाच्या सावलीत उभे राहून सावज शोधत असतात. जाळ्यात अडकल्यानंतर पावती फाडण्याची धमकी देऊन अव्वाच्या सव्वा दंड सांगतात. पावती न देता 100 ते 500 रुपये घेतल्यानंतर चालकांना सोडून देतात, असे प्रकार समोर येत आहेत.

पोलिस उपायुक्‍तांनी लक्ष द्यावे
सीताबर्डीत सर्वाधिक नियम तोडले जातात. चौकाचौकांत पोलिस असूनही ऑटोचालक आणि सुसाट वाहन चालविणारे त्यांना जुमानत नाहीत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने वाहनचालकही बेशिस्त असतात. धंतोलीतील अनेक हॉटेल्सना "अर्थपूर्ण' व्यवहार करून रस्त्यावर पार्किंग करण्याची मुभा आहे. नवनियुक्‍त पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: rash driving by youth in nagpur with attention of traffic police