आदिवासी बांधवांचा रावणपूजा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

अमरावती  : विरांगणा राणी दुर्गावती स्मारक समिती तथा बिरसा मुंडा क्रांती सेनेच्या संयुक्त सहकार्याने गोंडवाना सम्राज्ञी आदिवासी राजमाता शहीद विरांगणा राणी दुर्गावती जयंती तथा महान बहूजन असुर सम्राट शहीद गौंड राजा रावण पूजा (गोंगो) महोत्सवाचे आयोजन शनिवारी (ता. पाच) गर्ल्स हायस्कूल परिसरातील विरांगणा राणी दुर्गावती चौकात करण्यात आले होते. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा महोत्सव चालला.

या वेळी भारतीय इतिहासातील हुतात्म्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. आदिवासी समाजातील पारंपरिक रूढी, परंपरा यांच्या संरक्षणासाठी समाजाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जय सेवा, जय मुठवा.. जय दुर्गावती, जय गोंडवाना.. आणि जय बिरसा, जय फडापेन आदी घोषणांनी चौक दुमदुमून गेला होता. यंदा हे या महोत्सवाचे 13 वे वर्ष होते.
महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, महिलांनी पिवळी साडी तर पुरुषांनी पांढरे वस्त्र व खांद्यावर पिवळा दुपट्टा असा पोषाख परिधान करून महोत्सवात सहभागी झाले होते. स्मारक समितीने छापलेल्या पॉमप्लेटमध्ये मागील वर्षी समाजबांधवांनी दान केलेल्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा आत्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महानंदा टेकाम, संतोष धुर्वे, विठ्ठल मरापे व संभाजी कुमरे उपस्थित होते.
रावण दहनाचा निषेध
दसरा या सणाला रावण दहन करणाऱ्यांचा निषेध या वेळी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला. अमरावतीत जो कोणी रावण दहन करेल, त्याच्या पुतळ्याला चपलांची माळ घालून गाढवावरून मिरवणूक काढण्यात येईल. यासोबतच जिल्हाकचेरीसमोर त्या पुतळ्याचे दहन केले जाईल, असा इशारा समाजबांधवांनी दिला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravanpuja Festival of Tribal Brothers