बंडखोरांनी फोडला उमेदवारांना घाम

File photo
File photo

नागपूर : राज्याच्या पातळीवर भाजप-शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती व आघाडी झाली आहे. मात्र, विदर्भातील काही मतदारसंघात मित्रपक्षात बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ मतदारसंघात युती व आघाडीत धुसफूस सुरू असून हिंगणघाट व भंडाऱ्यात शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे नव घोषित झालेल्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला आहे.

यवतमाळात तीन मतदारसंघांत शिवसेनेची बंडखोरी?
यवतमाळ : जिल्ह्यात शिवसेनेला एकमेव दिग्रस विधानसभा मतदारसंघ सुटला आहे. यामुळे शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला असून यवतमाळ, वणी तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना शिवसेना बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो.
जिल्ह्यातील यवतमाळ, उमरखेड, वणी तसेच आर्णी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने संघटनात्मक बांधणी केली. युती झाल्या किमान तीन जागा सुटतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, युतीत सातपैकी केवळ दिग्रसची एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. उर्वरित जागा भाजप लढणार आहे. यामुळे शिवसैनिकांत सध्या मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे. विपरीत परिस्थितीत पक्षाला बळकटी दिल्यानंतरही उमेदवारी मिळत नसल्याने शिवसैनिक बंडाच्या तयारीत आहे. बंडांची ठिणगी यवतमाळ, वणी तसेच उमरखेड मतदारसंघात दिसत आहे.
यवतमाळमधून यवतमाळ विधानसभा सहसंपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी "जनतेचा उमेदवार' म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 2014 च्या निवडणुकीत अवघ्या एक हजार 200 मतांनी ढवळेचा पराभव झाला. यावेळी शिवसेनेला मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, तसे न झाल्याने संतोष ढवळे शुक्रवारी (ता. चार) नामनिर्देशनपत्र भरण्यावर ठाम आहे.
वणी विधानसभेतही बंडांचा झेंडा फडकायला सुरुवात झाली आहे. भाजपला मतदारसंघ सोडल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे गटतटांत असलेली शिवसेना सध्या एकसंध झाल्याचे चित्र आहे.
वणीतून माजी आमदार विश्‍वास नांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच युवा चेहरा असलेले आशीष खुलसंगे यांनीही बंडांचा झेंडा हाती घेतल्याची चर्चा आहे. दोघांपैकी एक निवडणुकीच्या आराखड्यात राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
उमरखेड विधानसभेतही सेना बंडखोर उभा राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पाच वर्षांपासून या भागात शिवसेनेची तयारी सुरू आहे. त्यामुळेच शिवसैनिकांच्या बुधवारी (ता. दोन) उमरखेड येथे झालेल्या बैठकीत लढण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. यामुळे या ठिकाणी डॉ. विश्‍वनाथ विनकरे किंवा निर्मला विनकरे लढण्याची शक्‍यता आहे.

नरेंद्र भोंडेकर दाखल करणार अर्ज
भंडारा : भाजपच्या ताब्यात असलेला भंडारा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला येणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. ते शुक्रवारी (ता. 4) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करणार आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती. 2009 च्या निवडणुकीत भंडारा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र, विद्यमान आमदार भाजपचे असल्याने हा मतदारसंघ स्वत:कडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत माजी आमदार भोंडेकर यांना युतीची प्रतीक्षा होती. युतीची घोषणा होताच भंडारा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची आशा धूसर झाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चार ऑक्‍टोबरला किसनलाल सभागृहातून मिरवणूक काढून नामांकन दाखल करण्याची तयारी केली आहे. भोंडेकर यांच्या बंडखोरीचा फटका युतीच्या उमेदवारास बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शिवसेनेचे अशोक शिंदे नाराज
हिंगणघाट (जि. वर्धा) ः भाजपने विद्यमान आमदार समीर कुणावार यांना हिंगणघाट येथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. शिवसेना या मतदारसंघावर आपला नैसर्गिक हक्क सांगत होती; परंतु भाजपने विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्यावर विश्‍वास व्यक्त करीत हिंगणघाट मतदारसंघ शिवसेनेकरिता सोडण्यास सपशेल नकार दिला. भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदार कुणावार यांना आधीच उमेदवारीवरून आश्‍वस्त केले होते. या काळात त्यांनी प्रचाराचा पूर्वटप्पा पूर्ण केला. त्याचवेळी अन्य पक्षाचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरून अनिश्‍चिततेच्या सावटात राहिले. हा मुद्दा उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात या पाच वर्षात मोठा दुरावा निर्माण झालेला आहे, दोन्ही पक्षांतील नेत्यांना एकमेकांवर विश्‍वास नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार कुणावार यांनी शिवसेनेवर विरोधात प्रचार केल्याचा जाहीररीत्या आरोप केला होता. यावरून मोठे वादळ उठले होते. 
मनसे-राष्ट्रवादीचे मेतकुट जमणार?
मनसेने जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेच्या पहिल्या 27 उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. येथे मात्र एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीचे मेतकुट जमणार ही वार्ता मतदारसंघात चांगलीच पसरली आहे. या वावड्याही ठरू शकतात. वांदिले यांनी मात्र उमेदवारी दाखल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. भाजपनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेटवर्क या मतदारसंघात आहे. बाजार समिती सभापती ऍड. सुधीर कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे यांच्यात उमेदवारीवरून गृहयुद्ध छेडले आहे. दोघांनीही आपला दावा ठोकून पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com