...अन्‌ अयोध्येतील कारावास आठवला 

नागपूर : अलाहाबाद येथील नैनी कारागृहात नागपुरातील कारसेवकांनी काढलेला फोटो
नागपूर : अलाहाबाद येथील नैनी कारागृहात नागपुरातील कारसेवकांनी काढलेला फोटो

नागपूर : अयोध्याप्रकरणी पहिल्या कारसेवेत नागपुरातील आठशे कारसेवक सहभागी झाले होते. "कुठे गोळीबार तर कुठे जेलभरो'सारखी भयाण स्थिती होती. तरीही न घाबरता, न डगमगता "राम नाम हम गाएंगे, मंदिर वही बनाएंगे'चा जयघोष करीत कारसेवक अयोध्येत पोहोचले होते. यावेळी नागपूरकर कारसेवकांना नैनी कारागृहात डांबण्यात आले. प्रवासात मोठ्या संख्येने महिला होत्या. हा चित्तथरारक अनुभव सांगताना आजही दीपक हरकरे यांच्या अंगावर काटा येतो. 

दुसरीकडे याच कारसेवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सहभागी झालेले आमदार अनिल सोले, योगेश बन, उदय डबले, श्रीपाद रिसालदार, ऍड. मंगेश मिरजकर, नगरसेवक संजय बंगाले, सुधाकर वाचासुंदर व पदाधिकाऱ्यांना बदायू कारागृहात डांबण्यात आले. 23 दिवसांनी त्यांची सुटका झाली. रामजन्मभूमी प्रकरणाचा शनिवारी न्यायालयाने निर्णय दिला अन्‌ पहिल्या कारसेवेचे नेतृत्व करणारे चेहरे बोलू लागले. यात हनुमाननगर येथील मनोज देशमुख, ऍड. उपेंद्र जोशी, गजानन तांबोळी व दीपक हरकरे यांचा सहभाग होता. 

दीपक हरकरे म्हणाले, विश्‍व हिंदू परिषदेने 30 ऑक्‍टोबर 1990 साली अयोध्येत पहिल्या कारसेवेची घोषणा केली. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यांचा कारसेवेला विरोध होता. मात्र, त्यांना न जुमानता लाखो कारसेवकांनी अयोध्येस जाण्याचा निर्णय घेतला. मिळेल त्या वाहनाने करसेवक अयोध्येस जात होते. महिलांचाही मोठा सहभाग होता. काहींनी तर मुंडण करून मडके घेऊन अस्थी विसर्जनाच्या नावावर अलाहाबाद गाठले. वाटेत रेल्वेची अन्‌ बसची तपासणी व्हायची. कारसेवक वेश बदलून जंगलमार्गाने अयोध्येस पोहोचत होते. 

नागपुरातून सुमारे 35 कारसेवकांचे जत्थे अयोध्येस गेले होते. अयोध्येत दाखल झालो तेव्हा स्थिती प्रचंड तणावाची होती. कडेकोट बंदोबस्तामुळे अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी "आम्ही कारसेवकांना रोखण्यात यशस्वी झालो' अशी घोषणा केली. लागलीच दिल्लीतून निसटलेले विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल दूधवाल्याच्या वेशात अयोध्येत दाखल झाले. 

अशोक सिंघल कारसेवेचे नेतृत्व करतात म्हटल्यावर हजारो कारसेवकांनी अयोध्येचा ताबा घेतला. पोलिसांनी कारसेवकांना बाबरीपासून जाण्यास रोखले; पण साधूंच्या एका जत्थ्याने पोलिसांच्या गाडीने सुरक्षेचे कठडे तोडत बाबरीच्या दिशेने प्रारंभ केले. स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, हे सिंघल यांनाही ज्ञात होते. अखेर घुमटावर भगवा फडकविल्यानंतर सिंघल यांनी कारसेवा संपल्याचे जाहीर केले. मात्र, लगेच सुरू झालेल्या अटकसत्रामुळे नागपूरकर कैदेत अडकले. 

मुलायम सिंग यांनी दिले गोळीबाराचे आदेश 
मुलायम सिंग यांनी लष्करास गोळीबाराचे आदेश दिले. प्रचंड नरसंहार झाला. प्रकरण शांत होत नाही तोवर कारागृहात डांबलेल्या कारसेवकांना तेथेच ठेवण्याचे आदेश आले अन्‌ नैनीतील कारसेवक दहा दिवसांसाठी तर बदायूतील कारसेवक 23 दिवसांसाठी अयोध्येत अडकले. आठ नोव्हेंबर 1990च्या आसपास नागपूरकर कारसेवकांनी नैनी कारागृहात काढलेला फोटो दीपक हरकरे यांच्याकडे संग्रहित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com