गावाचा कारभार स्वीकारण्यास शिक्षकांचा नकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

कन्हान  (जि.नागपूर):  जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी 23 ऑगस्टपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. सद्य:स्थितीत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रान्वये ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज चालविण्याच्या दृष्टीने ग्रामस्तरावरील कामकाज बाधित होऊ नये म्हणून ग्रामसेवकांचे आंदोलन संपेपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज सांभाळण्यासाठी सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

कन्हान  (जि.नागपूर):  जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी 23 ऑगस्टपासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. सद्य:स्थितीत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रान्वये ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज चालविण्याच्या दृष्टीने ग्रामस्तरावरील कामकाज बाधित होऊ नये म्हणून ग्रामसेवकांचे आंदोलन संपेपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज सांभाळण्यासाठी सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. अध्यापनाची जबाबदारी सोडून गावाचा कारभार स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला असून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. 
ग्रामसेवक आंदोलनात असल्यामुळे त्यांचा गाव सांभाळण्याचा कारभार जिल्हा परिषदेने शिक्षकांना देण्याचे आदेश दिले आहेत. गावातील विहिरी, बोरवेल इत्यादी पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे, क्‍लोरिनेशन करणे, गावात स्वच्छता राखणे, नाल्या स्वच्छ ठेवणे, डासांपासून बचावासाठी नियमित धूरफवारणी करणे, ग्रामपंचायतमधील अत्यावश्‍यक सेवा खंडित होणार नाही व कुठलीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे अफलातून आदेश ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले. असे आदेश काढताना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे काय, याचा विचारही करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य शाळा प्राथमिक वर्गाच्या असून या शाळांतील मुख्याध्यापकांकडे शाळेच्या कार्यालयीन कामकाजाबरोबरच दोन वर्गाला अध्यापन करण्याची जबाबदारी असल्यामुळे हे काम स्वीकारण्यास शिक्षकांचा विरोध आहे. बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 27 नुसार शिक्षकांना दशवार्षिक जनगणना, नैसर्गिक आपत्ती निवारण व निवडणुका या व्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे देण्यास मनाई केलेली आहे. असे असताना जिल्हा परिषदेकडून मुख्याध्यापकांना दिलेले ग्रामसेवकांच्या अधिभाराचा शाळाबाह्य काम करण्याचा आदेश तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The refusal of teachers to accept the charge of the village