वैद्यकीय प्रवेशाच्या याचिका स्थानांतरित करण्यास नकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यास मुख्य न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा नकार दिला. 

नागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यास मुख्य न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा नकार दिला. 

मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आक्षेप घेणाऱ्या याचिका डॉ. शिवांगी रघुवंशी, डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुप लद्दढ, डॉ. रसिका सराफ आदींनी दाखल केल्या आहेत. यात दंतचिकित्सा, रेडीऑलॉजी, मेडीसिन यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील प्रवेशासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 30 नोव्हेंबरला सामाजिक व आर्थिक मागासवर्गीय प्रवर्ग (एसईबीसी) यांच्यासाठी मेडिकल पदव्युत्तरच्या एकूण जागांपैकी 16 टक्के जागा आरक्षित करण्याचा कायदा लागू केला. तर घटनात्मक आरक्षण एकूण उपलब्ध जागांच्या अनुषंगाने देण्यात येते. त्यामुळे एसईबीसी कायद्याने लागू केलेले आरक्षण राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील काही याचिका मुंबई उच्च न्यायालयातही प्रलंबित आहेत. त्यामुळे नागपूर खंडपीठासमोर दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित कराव्या, अशी विनंती करण्यात आली होती. त्याला मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी नकार दिला होता. मात्र, या आदेशात दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली होती. आज ही विनंतीही मुख्य न्यायमूर्तींनी फेटाळून लावली. या प्रकरणात नागपूर खंडपीठातील सुनावणीदरम्यान प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असतील, असे आदेश न्या. सुनील शुक्रे व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी दिले आहेत. या सर्व याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आल्या आहेत. 

Web Title: Refused to transfer the petition for admission to medical