रजिस्टर पोस्टाने पोहोचणार मतपत्रिका!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतपत्रिकांचा घोळ टाळण्यासाठी मतदारांपर्यंत थेट रजिस्टर पोस्टाने मतपत्रिका पोहोचणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (मंगळवार) जाहीर केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 90 वे साहित्य संमेलन डोंबिवलीत घेण्याची "औपचारिक‘ घोषणा करून संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. 

नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतपत्रिकांचा घोळ टाळण्यासाठी मतदारांपर्यंत थेट रजिस्टर पोस्टाने मतपत्रिका पोहोचणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (मंगळवार) जाहीर केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 90 वे साहित्य संमेलन डोंबिवलीत घेण्याची "औपचारिक‘ घोषणा करून संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. 

निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. मकरंद अग्निहोत्री आणि उपअधिकारी म्हणून मोहन पारखी यांची निवड झाली आहे. 12 ऑक्‍टोबरला सायंकाळी 5 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर 17 ऑक्‍टोबरपर्यंत नावे परत घेता येणार आहेत. मतदारांकडे 25 ऑक्‍टोबरला रजिस्टर पोस्टाने मतपत्रिका पोहोचतील आणि 10 डिसेंबरपर्यंत मतपत्रिका स्वीकारल्या जातील. 11 डिसेंबरला मतमोजणी होऊन अध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल. मतदार यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपविल्यानंतर महामंडळाचा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप नसतो, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. सोबतच यापूर्वी तसा हस्तक्षेप झाला असेल तर तो दुर्दैवी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मतपत्रिका रजिस्टर पोस्टाने पोहोचणार असल्या तरी घोळ परतीच्या मार्गावर होतो, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत त्यावर महामंडळ नियंत्रण कसे आणेल, असा सवाल केला असता तसे होणार नाही, असा विश्‍वास अध्यक्ष व्यक्त करतात. घटनेतील तरतुदीनुसार मतदारांना स्वतः किंवा टपालाने किंवा प्रतिनिधीद्वारे आपली मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविता येते. प्रतिनिधीचा पर्याय वगळला तरच घोळ थांबण्याची शक्‍यता आहे, असेही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचविले. पण, त्यासाठी घटनादुरुस्ती समितीकडे तसा प्रस्ताव येणे आवश्‍यक आहे, हेही महत्त्वाचे. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांची उपस्थिती होती.

कसा रोखणार बडेजाव?
डोंबिवली येथील आगरी यूथ फोरम ही आयोजक संस्थादेखील "अर्थ‘पूर्ण आहे. अशा परिस्थितीत संमेलनाचा बडेजाव कसा रोखणार, या प्रश्‍नावर, संमेलन-निमंत्रक संस्थेला मार्गदर्शक सूचनांची यादी दिली असल्याचे डॉ. जोशी सांगतात. मात्र त्याचवेळी अध्यक्ष म्हणून तसा नियम करता येत नाही, असा नाइलाजही ते व्यक्त करतात.

शेवाळकर स्मृती पुरस्कार
शेवाळकर कुटुंबीयांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारून दरवर्षी प्रत्येकी एक लाख रुपयांचे स्व. प्रा. राम शेवाळकर स्मृती "साहित्यव्रती‘, "भाषाव्रती‘ आणि "वक्तादशसहस्रेषु‘ असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली. महामंडळातर्फे यासाठी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  

Web Title: Registered post to reach the ballot!