esakal | इथं रक्ताची नातीही पडली थिटी, अस्थींना नाही वाली
sakal

बोलून बातमी शोधा

last rituals

इथं रक्ताची नातीही पडली थिटी, अस्थींना नाही वाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनामुळे (coronavirus) रक्ताची नाती दुरावल्याचे चित्र आपण सर्वसामान्यपणे पाहत असतो. मात्र, मृत्यूनंतरसुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या अस्थी नेण्यासाठी अनेकांच्या कुटुंबातील लोक, नातेवाईक तयार नाहीत. हा दुर्दैवी तसेच मनाला चटका लावणारा प्रकार विलासनगर येथील स्मशानभूमीत समोर आला आहे. याठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या शहरातील तसेच बाहेरगावच्या जवळपास 67 ते 70 मृतांच्या अस्थींची पोती बांधून ठेवण्यात आल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. (relatives not ready to take asthi of deceased in amravati)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

शहरातील हिंदू स्मशानभूमीसोबतच विलासनगर येथील स्मशानभूमीत मागील एका महिन्यापासून कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सामान्यपणे अग्निसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृताच्या कुटुंबीयांकडून अस्थी विसर्जनाची क्रिया करण्यात येते. अमरावतीमध्ये केवळ अमरावती शहरच नव्हे तर नागपूर, वर्धा, यवतमाळ तसेच मध्य प्रदेशातून रुग्ण उपचारासाठी येताहेत. त्यातील अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांचे पार्थिव कुटुंबाला न देता स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानुसार विलासनगर येथील स्मशानभूमीत मागील एका महिन्यात अनेक कोरोना रुग्णांच्या शवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील काही मृत व्यक्तींचा समावेश आहे. मात्र महिना उलटून गेल्यानंतरही अंत्यसंस्कार झालेल्यांचे नातेवाईक त्यांच्या अस्थी घेण्यासाठी आलेले नसल्याने स्मशान संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एका शेडमधील पोत्यांमध्ये त्या अस्थी बांधून ठेवल्या आहेत.

दाम्पत्याच्या अस्थी एकाच पोत्यात

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या बाहेरगावच्या पती- पत्नीचा अंत्यसंस्कारसुद्धा याच स्मशानभूमीत करण्यात आला होता, मात्र आज एका महिन्यानंतर सुद्धा त्यांचे कुटुंबीय अस्थी घेण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे पती व पत्नीच्या अस्थी एकाच पोत्यामध्ये बांधून ठेवल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कोविडमुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या स्मशानभूमीमध्ये अनेक जणांच्या अस्थी तशाच पडून आहेत. त्यामध्ये बाहेरगावच्या लोकांचा भरणा अधिक आहे. कुणीच न आल्याने आम्ही त्या अस्थी बांधून ठेवल्या आहे.
-भालेराव, केअरटेकर, विलासनगर, स्मशानभूमी.