जात, धर्म, पंथाला छेदून फुलले मैत्रीचे नाते

Munir
Munir

नागपूर,  मुनीर खान आणि विशाल उगले यांच्या मैत्रीची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. त्यांच्या निखळ मैत्रीची कथा उकलत असताना जात, पात, धर्म, पंथ या भेदांच्या भिंती केवळ कागदावर शोभून दिसत असल्याचे जाणवले. तीस-पस्तीस वर्षांपासून त्यांची निष्पाप मैत्री, नव्हे तर ते दोघे भाऊ म्हणून आयुष्य जगत आहेत. जात, धर्म अन्‌ पंथाला छेदून मुनीर खान अन्‌ विशाल यांच्या मैत्रीचे नाते फुलत आहे.नामांतर शहिद दिनाच्या पुर्वसंध्येला मुनीर खान दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. सोबत एक मित्र होता, सहज संवाद साधल्यांतर मुनीर हे नाव कानावर आदळले आणि त्याच्याशी संवाद साधला. मुनीर म्हणाला, नाते जोडले जाते ती ओढ असते, आणि तीच ओढ मैत्रीचा धागा निरंतर जोडून ठेवते. मुनीर नावावरून मुस्लिम असल्याचे सहज लक्षात येते. परंतु सोबत असलेल्या तरुणाचे नाव विशाल असे सांगताच मैत्रीचे नाते अतूट असल्याचे जाणवले. मुनीर आणि विशाल कुठले आहेत, दीक्षाभूमीवर कसे आले यासंदर्भात कोणताही सवाल न करता, त्यांच्या आयुष्याच्या गाठी उकलताना मैत्रीच्या पवित्र नात्यातील घट्ट असलेल्या आपुलकीचा स्पर्श हृदयाच्या कप्प्यात कोरला गेला.विशालची आई सावित्री आणि वडील आप्पा यांना तीस वर्षांपूर्वी शाहिरीचा कार्यक्रम सुरू असताना "जत्रेत' मुनीर भेटला. त्यावेळी तो अवघा पाच वर्षांचा होता. तेव्हापासून मुनीर आणि विशाल दोघांची मैत्री एकाच घरी फुलू लागली. आईवडिलांसाठी मात्र ते दोघे भाऊच होते. विशाल मुनीरपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, परंतु जात, धर्म यांच्या पलीकडे दोघेही भावाप्रमाणे जगू लागले. मुनीर आणि विशाल दोघांना कलेची आवड. विशाल एका खासगी कंपनीत कामाला आहे. तर मुनीर कलाप्रांतात. दोघांचीही भाषा वेगळी, धर्म वेगळा मात्र त्यांच्या मैत्रीत भाषेचं कुंपण आडवं आलं नाही, तर वयाचं बंधन दिसलं नाही. पाण्यासारखी तरल त्यांची मैत्री दिवसेदिवस उजळून निघत आहे. दोघांचेही लग्न झाले. दोघांच्याही परिवारात आज मैत्रीच्या विश्‍वासाचा ओलावा निर्माण झाला आहे.ज्या उगले कुटुंबात लहानाचा मोठा झाला, त्या कुटुंबाने मुनीरला "मन्या' हे घरगुती नाव दिले. विशाल मात्र मुनीर भाऊच म्हणतो. मन्याचे लग्न उगले कुटुंबाने मुस्लिम पद्धतीने लावून दिले. मुनीर आजही म्हणतो, मी मोठा असलो तरी, विशालच्या मैत्रीतून नवी ऊर्मी मिळते. तर आपल्या "डे' संस्कृतीमध्ये फ्रेण्डशिप "डे' विशालसोबत, मदर्स डे सावित्रीआई आणि असह्य वेदना सोसून जन्म देणारी आई नादान बेग यांच्यासोबत घालवतो. आपले करिअर घडविण्यासाठी आयुष्य वेचणारे आप्पासाहेब यांच्या ऋणात आयुष्यभर राहू इच्छितो, असेही मुनीर खानने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com