
रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून विक्री करणारी टोळी गजाआड
तिवसा (जि. अमरावती) : काल रात्री १.३०च्या सुमारास अमरावती शहर गुन्हे शाखेने अमरावती येथील संजीवनी खाजगी कोविड सेंटर (Sanjeevani covid Center) येथे सापळा रचून रेमडीसिव्हर इंजेक्शनचा (Remedial injection) होत असलेला काळाबाजार उघडकीस आणला. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारीसह इतर चार जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे. (remediation injections selles gang arrested in Amravati)
एकीकडे रेमडीसिव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असतानाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनच्या काळाबाजार करून त्याची चढ्या दरात विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अमरावती शहर गुन्हे शाखेने केला आहे. मागील काही दिवसांपासून हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने काल रात्री ११ वाजता पोलिसांनी बनावट ग्राहक बनून सापडा रचत छापेमारी केली.
हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्कम परत
काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांमध्ये तिवसा येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे व भातकुली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय राठोडसह ४ खाजगी कर्मचारी अशा एकूण सहा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी १० रेडमडीसिव्हर इंजेक्शनसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
ऑक्सिजन सिलिंडर स्वतःच्या रुग्णालयात वापरले
तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयाचा शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे हा तिवसा येथील रुग्णालयात आलेले रेमडीसिव्हीर इंजेक्शन अमरावती येथील लॅबच्या असिस्टंटला पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. तेथून लॅबमधील असिस्टंट हा गरजू रुग्णांना दहा ते बारा हजार रुपयांपर्यत विक्री करीत होता, अशी माहिती समोर आली आहे. तिवसा रुग्णालयातील इतरही औषधी पुरवठा विभागातून परस्पर काढून खासगी रुग्णालयात नेत असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी ग्रामीण रुग्णालयाच्या नावाने येत असलेले ऑक्सिजन सिलिंडर स्वतःच्या रुग्णालयात वापरली असे सुद्धा समजते.
हेही वाचा: Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम
मोठी टोळी सक्रिय
तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे, भातकुली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय राठोड, सुपर स्पेशलिटी रुग्णालयामधील अटेंडन शुभम सोनटक्के, शुभम कील्हेकर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील परीचालिका पूनम सोनवणे, लॅब असिस्टंट अनिल गजानन पिंजरकर अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असू शकतो किंवा जिल्ह्यात अशा प्रकारची मोठी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
(remediation injections selles gang arrested in Amravati)
Web Title: Remediation Injections Selles Gang Arrested In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..