एमए राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये प्रश्‍नांची पुनरावृत्ती 

एमए राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये प्रश्‍नांची पुनरावृत्ती 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील एम. ए. राज्यशास्त्राच्या चौथ्या सेमिस्टरच्या "प्रेशर ग्रुप ऍण्ड सोशल मुव्हमेंट्‌स' आणि "आंतरराष्ट्रीय संस्था' या दोन पेपरमध्ये एकच प्रश्‍न वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात विचारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या चारही प्रश्‍नांचे उत्तर एकच असल्याने 80 गुणांच्या पेपरमध्ये 30 ते 50 गुण मिळण्याची शक्‍यता आहे. या प्रकाराने अभ्यास मंडळाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पेपर सेटिंग करताना अभ्यास मंडळाकडून पुन्हा एकदा चूक झाल्याचे दिसून येत आहे. 

विधी शाखेच्या एलएलबी (तीन वर्षे) चौथ्या सेमिस्टरच्या "इंटेलेक्‍च्युअल प्रॉपर्टी लॉ' या विषयाचा पेपर 22 मार्चला घेण्यात आला. या पेपरमध्ये 22 गुणांचे बहुपर्यायी प्रश्‍न विचारण्यात आले होते. बीएएलएलबीच्या (पाच वर्षे) चौथ्या सेमिस्टरमध्येही एका गुणाचा प्रश्‍न एकदा दोनदा विचारण्यात आला. आता 15 मे रोजी एम. ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील चौथ्या सेमिस्टरच्या "प्रेशर ग्रुप ऍण्ड सोशल मुव्हमेंट्‌स' आणि 17 मे रोजी "आंतरराष्ट्रीय संस्था' या पेपरमध्ये एकच प्रश्‍न वेगवेगळ्या स्वरूपांत विचारण्यात आले आहेत. एकच प्रश्‍न चारदा फिरवून विचारल्याने एकच उत्तर चारदा लिहिले तरी या विषयात उत्तीर्ण होणे सोपे असल्याचे दिसून आले. त्यामुळे यासंदर्भात विद्यापीठाकडे कुणीही तक्रार केली नाही. मात्र, असे असले तरी एकाच विषयाच्या एकाच पेपरमध्ये एकाच प्रश्‍नाची चारदा पुनरावृत्ती झाल्याने परीक्षा पद्धती आणि अभ्यास मंडळाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

असा होता प्रश्‍न 
15 मे रोजी "प्रेशर ग्रुप ऍण्ड सोशल मुव्हमेंट्‌स' या विषयाच्या पेपरमध्ये प्रश्‍न क्रमांक 1 (ए) मध्ये "सामाजिक आंदोलनाचा अर्थ आणि महत्त्व' या विषयावर लिहायचे होते. प्रश्‍न क्रमांक 2 (बी) मध्ये पुन्हा "सामाजिक आंदोलनाचा अर्थ आणि विचारधारा, प्रश्‍नक्रमांक 5 (सी) मध्ये पुन्हा "सामाजिक आंदोलनाचा अर्थ आणि आधुनिकीकरण' या विषयावर लघुनिबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. तसेच प्रश्‍न क्रमांक 1 (बी) मध्ये "दबाव समूह (प्रेशर ग्रुप) काय आहे ? त्याची कार्यशैली कशी आहे ? हे विचारण्यात आले आहे. प्रश्‍न क्रमांक 5 (डी) मध्ये हा प्रश्‍न पुन्हा "दबाव समूहांच्या आधुनिक कार्यशैलीवर लघुनिबंध लिहिण्यास सांगितले आहे. 

17 मे रोजी झालेल्या "आंतरराष्ट्रीय संस्था' या विषयावर प्रश्न क्रमांक 2 (ए) मध्ये "युनाईटेड नेशन्स' या विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. (बी) प्रश्‍नात "युनाईटेड नेशन्सद्वारे शांती स्थापनेची भूमिका विचारण्यात आली होती. प्रश्‍न क्रमांक 3 (ए) मध्ये "वर्ल्ड बॅंकचे प्रारूप आणि काम' या विषयावर प्रश्‍न विचारण्यात आला. हाच प्रश्‍न क्रमांक 5 (सी) मध्ये पुन्हा एकदा "वर्ल्ड बॅंकेचे महत्त्व' या विषयावर लघुनिबंध विचारण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com