जिवंतपणी नाही, पण मृत्यूनंतर ते करतात विमानवारी, वाचा काय आहे प्रकार

शनिवार, 27 जून 2020

या समाजातील बहुतांश लोकांनी मृत्यूनंतर विमानातून प्रवास करून स्वर्ग गाठल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितले जाते. एवढेच नव्हे तर मृताच्या समाधीवर विमानाची हुबेहूब प्रतिकृतीसुद्धा लावण्यात येते. त्यामुळे आदिवासी समाजात पारंपरिक संस्कृती, रीतिरिवाजात आता मृत्यूनंतरच्या विमानवारीने नव्या संस्कृतीकरणाची भर पडली आहे.

गडचिरोली : मनुष्याच्या कर्माच्या आधारे तो मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात जातो याबाबत आजही समाजात समज, गैरसमज आहेत. याउलट आदिवासी समाजातील माडिया जमातीमध्ये मनुष्याच्या मृत्यूबद्दल एका नव्या विचाराचा उगम झाल्याचे दिसून येत आहे.

या समाजातील बहुतांश लोकांनी मृत्यूनंतर विमानातून प्रवास करून स्वर्ग गाठल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितले जाते. एवढेच नव्हे तर मृताच्या समाधीवर विमानाची हुबेहूब प्रतिकृतीसुद्धा लावण्यात येते. त्यामुळे आदिवासी समाजात पारंपरिक संस्कृती, रीतिरिवाजात आता मृत्यूनंतरच्या विमानवारीने नव्या संस्कृतीकरणाची भर पडली आहे.

जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटते की, आपण एकदा तरी विमानातून प्रवास करावा. मात्र, आर्थिक समस्येमुळे अनेकांच्या नशिबी तो सुखकर प्रवास लाभत नाही. डोंगर, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना आता कुठं नक्षल घडामोडीमुळे हेलिकॉप्टर तरी बघण्याची संधी मिळते. मात्र, यातून त्यांच्या जगण्याची दृष्टी बदलत चालली आहे. जिवंतपणी न मिळालेल्या संधीचा ते आपल्या रक्ताच्या व्यक्तीला मृत्यूनंतर विमान वारीची संधी उपलब्ध करून देत आहेत.

वाचून कदाचित आश्‍चर्य वाटेल, परंतु माडिया जमातीतील कित्येकांनी आपल्या हयातीत नाही तर मृत्यूनंतर विमानातून काल्पनिक स्वर्गवारी केली. माडिया ही आदीम आदिवासी समाज विशिष्ट भूभागात वास्तव्याला आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, धनोरा, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा या तालुक्‍यात प्रामुख्याने माडिया या आदीम आदिवासी जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. या जमातीची जीवनशैली, प्रथा, परंपरा, आचार-विचार बाह्य जगापेक्षा वेगळे आहेत.

या भूभागात प्रवास करताना रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीतील समाधीवर उंच दगडावर किंवा शृंगारकाम केलेल्या झाडाच्या खोडावर हेलिकॉप्टर किंवा विमान बसवलेले दिसतील. या जमातीतील माणूस मरण पावल्यानंतर जेव्हा एक-दोन वर्षांनी "दिनाल्क' (वर्षश्राद्ध) करतात तेव्हा अशा पद्धतीने हेलिकॉप्टर किंवा विमान बसवितात. मरण पावलेला माणूस जेवढा वयस्कर व त्याची जेवढी ख्याती असेल त्याप्रमाणे त्याचा सन्मान म्हणून विमान प्रवासाची एक नवी प्रथा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागात आदिवासींच्या समाधीवर लाकूड, टिनाचे पत्रे यापासून तयार केलेल्या हुबेहूब विमानाच्या प्रतिकृती दिसून येते.

अवश्य वाचा- नातेच उठले जीवावर, शेतीच्या वादातून नातवानेच केली आजीची हत्या

आदिम जमातीच्या संस्कृतीचा भाग
भामरागड, एटापल्ली, धनोरा, अहेरी, सिरोंचा हे अतिसंवेदनशील तालुके आहेत. यामुळे नक्षलवादी आणि पोलिस यांच्यात अधूनमधून संघर्ष होत असतो. अशावेळी या भागात नेहमीच हेलिकॉप्टर येत असल्याने या भागातील लोकांना हेलिकॉप्टरची तोंडओळख आहे. तसेच नक्षलवादी या भागात येण्यापूर्वी माडिया या आदीम जमातीचे लोक आकाशातून विमान किंवा हेलिकॉप्टर जाताना दिसल्यास आकाशातून देव जात आहे, असे म्हणायचे. या सर्व गोष्टीचा परिणाम होऊन आज हेलिकॉप्टर व विमान हे माडिया या आदीम जमातीच्या संस्कृतीचे भाग बनले आहे.
ऍड. लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ते भामरागड.