वाळलेल्या संत्राबागांची मिळणार भरपाई?

विनोद इंगोले
शुक्रवार, 21 जून 2019

नागपूर ः विदर्भातील उन्हाने होरपळलेल्या संत्रा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी अधिवेशन काळात मदत जाहीर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळ काळात वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांची माहिती कृषी विभागाकडून तडकाफडकी मागविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नागपूर ः विदर्भातील उन्हाने होरपळलेल्या संत्रा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी अधिवेशन काळात मदत जाहीर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळ काळात वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांची माहिती कृषी विभागाकडून तडकाफडकी मागविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नागपुरी संत्र्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागात संत्र्याची लागवड होते. यंदा भूजल पातळीत झालेली घट आणि तीव्र उन्हाच्या झळांमुळे संत्रा बागा जळण्याचे प्रकार विदर्भात सर्वदूर घडले. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील संत्रा बागांना याचा सर्वाधिक फटका बसला. नागपूरच्या काटोल, कळमेश्‍वर तालुक्‍यातील संत्रा बागांची स्थितीदेखील अशीच आहे. वर्धा जिल्ह्यातही काही क्षेत्रात संत्रा लागवड असून, तेथील शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी विकत घेत बागा जगविण्याचे प्रयत्न केले. परंतु हा प्रयत्न पुरेसा ठरला नाही. गेल्या अनेक वर्षांत जपलेल्या बागांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत सरण झाले होते. आता नव्याने संत्रा लागवड केल्यानंतर उत्पादनासाठी पाच ते सहा वर्षे शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा तरल्या त्यांच्याकडील आंबिया बहार उन्हामुळे गळाला. ही बाब लक्षात घेत अडचणीतील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्‍टरवरील संत्रा बागा उन्हामुळे जळाल्याचा अहवाल देण्यात आला. अमरावती विभागात 16 हजार हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे.
कॉंग्रेसने दिली होती मदत
कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सत्ताकाळात संत्रा उत्पादकांना नुकसानीभरपाईपोटी हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत दिली होती. त्याच धर्तीवर आताही मदत मिळावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांची आहे. दरम्यान कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे संत्रापट्टयाचे नेतृत्व करणारे असल्याने ते या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सरकारकडून जळालेल्या बागांचा अहवाल मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reproduction of dried oranges?