धंतोली दवाखान्यांसाठी राखीव करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नागपूर - धंतोलीतील दवाखान्यांत पार्किंगची जागाच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा असल्याची गंभीर दखल घेत "धंतोलीतील सर्व घरे रिकामी करून दवाखान्यांसाठी राखीव करा' या शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 27) महापालिकेच्या कार्यपद्धतीवर मौखिक ताशेरे ओढले. 

धंतोली नागरिक मंडळाने दवाखान्यांसमोर उभे राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून याचा फटका नागरिकांना होत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. याच मुद्द्यावर धंतोली नागरिक मंडळाने यापूर्वीदेखील जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये शहरातील वाहतुकीशी निगडित विविध प्रश्‍नांवरील जनहित याचिका जोडण्यात आल्या आहेत. यामध्ये धंतोलीचा मुद्दा मागे पडला आहे. यामुळे धंतोलीतील वाहतुकीच्या समस्येवर प्रकाश टाकणारी नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्‍टर मंडळी बहुमजली दवाखाने बांधतात. मात्र, त्यासाठी पर्याप्त इतकी पार्किंग क्षमता ठेवण्यात येत नाही. धंतोलीमध्ये 10 ते 12 मजली इमारतींचा समावेश आहे. इमारतीच्या तुलनेत असलेली पार्किंगची जागा अत्यंत माफक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यामुळे महापालिकेने बांधकामासाठी मंजुरी देण्यापूर्वीच पार्किंसाठी आवश्‍यक जागा ठेवण्यात येईल, असे मंजूर करून घ्यायला हवे असे याचिकेमध्ये म्हटले आहे. 

धंतोलीतील समस्येवर एकामागून एक जनहित याचिका दाखल होत असताना महापालिका काय करतेय, असा सवाल न्यायालयाने विचारला. तसेच नगरविकास विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त आदी प्रतिवादींना नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुनावणी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. आशुतोष धर्माधिकारी, महापालिकेतर्फे ऍड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली. 

Web Title: Reserved for Dhantoli Hospitals