भांडेवाडीतील बायोगॅसमुळे वस्त्यांना आगीचा धोका

राजेश प्रायकर
बुधवार, 12 एप्रिल 2017

नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आहेच, भविष्यात आगीत होरपळून मरण्याचीही वेळ त्यांच्यावर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील आग आजही कायम आहे. येथे दररोज 1100 टन कचरा साठविला जात आहे. मात्र, अद्याप येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कुठलेही ठोस धोरण किंवा पद्धतीबाबत महापालिका गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कचऱ्यावर प्रक्रियेचे केवळ प्रयोग सुरू असून भांडेवाडी महापालिकेने प्रयोगशाळाच केल्याचे चित्र आहे. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याचा ढिगारा वाढत आहे. परिणामी या ढिगाऱ्यात बायोगॅस तयार होत असून यात पंचावन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिथेन गॅसची निर्मिती होत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी नमूद केले. मिथेन गॅस ज्वलनशील असल्याने वाढत्या कचऱ्यामुळे या ज्वलनशील वायू भविष्यात या परिसरातील वस्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात आतापर्यंत केवळ विषारी धुराने त्रस्त असलेल्या नागरिक, चिमुकले, महिला आगीत होरपळून निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. केवळ आगीवर पाणी मारून थातूरमातूर कार्यवाही करीत आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांना एखादवेळी मोठ्या दुर्घटनेत होरपळून मरण्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिका आगीच्या मोठ्या घटनेत होरपळण्याची प्रतीक्षा करीत आहे का? असा सवाल या परिसरातील प्रा. सचिन काळबांडे यांनी उपस्थित केला.

या वस्त्यांना धोका
भांडेवाडी, वाठोडा, पवनशक्तीनगर, अब्बूमियानगर, सावननगर, साहिलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, मेहरनगर या डम्पिंग यार्डनजीकच्या वस्त्यांत ज्वलनशील वायू पसरून आगीचा धोका आहे.
 

अनेकांना कॅन्सरची शक्‍यता
डम्पिंग यार्डला दरवर्षी आग लागत असून, मोठ्या प्रमाणातून निघणारा धूर या परिसरातील नागरिक श्‍वसनाद्वारे शरीरात घेतात. डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीतून डायऑक्‍सिन्स व फ्युरेन्ससारख्या गॅसही निघत असून, त्यामुळे नागरिक, लहान मुले, महिलांना कॅन्सरचा धोका आहे. यकृत व शरीरातील मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम होण्याची शक्‍यता पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चॅटर्जी यांनी व्यक्त केली.

वातावरणात धोकादायक वायू
डम्पिंग यार्डमधील सततच्या आगीमुळे कार्बन मोनोक्‍साईड, नायट्रोजन मोनोक्‍साईड, सल्फर ऑक्‍साईड, हायड्रोक्‍साईड ऍसिड, पॉलि अएरोमॅटिक हायड्रोकार्बनसारखे विषारी वायू वातावरण पसरत आहेत. या वायूमुळे परिसरातील नागरिकांना दमा, डोळ्याचे आजार, खाज, गजकर्णासारखे आजार होण्याची शक्‍यता आहे. नायट्रोजन ऑक्‍साईड व सल्फर ऑक्‍साइड एकत्र आल्यास एसिड रेनची शक्‍यता आहे.

डम्पिंग यार्डमधील सततच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करून प्रकल्प विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तत्काळ पाणी सुरू करून आगीवर मारा करता येईल.
-डॉ. प्रदीप दासरकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) मनपा.

मोठ्या प्रमाणात साठलेल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार होत आहे. बायोगॅसमध्ये 55 टक्के मिथेन असून, ते ज्वलनशील आहे. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आगीच्या घटना होत आहे.
-कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन

Web Title: residence fire danger by biogas