निवासी डॉक्‍टरची वसतिगृहात आत्महत्या

निवासी डॉक्‍टरची वसतिगृहात आत्महत्या

नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (27, रा. नेहरूनगर, बाजरी हवेली, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. त्याने कर्नाटक येथूनच एमबीबीएसचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर अभ्यासप्रमासाठी त्याला मेयो वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला असून त्याने स्त्रीरोग व प्रसूती अभ्यासक्रम निवडला होता. प्रवेशप्रक्रियेनंतर दोन महिन्यांपूर्वीच तो नागपुरात आला होता. मेयोतील जुन्या पीजी बॉईज होस्टेलच्या खोली क्रमांक 33 मध्ये तो सहकाऱ्यांसोबत वास्तव्यास होता. गुरुवारी सहकारी रात्रपाळीसाठी निघून गेल्यानंतर मनूकुमार एकटाच होता. शुक्रवारी सकाळी साडेआठपासून मनूकुमारची ड्यूटी स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या ओपीडीत होती. नऊ वाजूनही तो पोहोचला नसल्याने युनिट- 1चे प्रमुख डॉ. प्रशांत उईके यांनी एका इन्टर्नकरवी डॉ. मनूकुमारला फोन केला. रिंग जाऊनही प्रतिसाद मिळाला नाही. इन्टर्नने त्याच्या खोलीवर जाऊन बाहेरून आवाज दिला. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. इन्टर्नने रक्षकाच्या मदतीने खिडकी उघडली असताना डॉ. मनूकुमार जमिनीवर पडला होता. त्याच्या गळ्याभोवती फास लटकत होता. त्याला तातडीने मेयोच्या अपघात विभागात आणण्यात आले. पण, तोवर उशीर झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पण, त्याच्या गळ्याभोवती बॅंडेज पट्टी असल्याचे सांगण्यात आले.
निवासी डॉक्‍टरांमध्ये तणावाचे वातावरण
निवासी डॉक्‍टरांना सातत्याने कामात व्यस्त ठेवले जाते. झोप, अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉ. मनूकुमार तणावात असल्याचे काही सहकारी मित्रांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. डॉ. मनूकुमारने दोन महिन्यांत महाविद्यालय प्रशासन किंवा निवासी डॉक्‍टरांची संघटना मार्डकडे कुठलीही तक्रार केली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनेची माहिती नातेवाइकांना देण्यात आली असून ते पोहोचल्यानंतरच शवविच्छेदन केले जाणार आहे. घटनेनंतर निवासी डॉक्‍टरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com