ताडोबातील रिसॉर्ट, स्टेहोमचालक व इतर लागले देशोधडीला… काय असावे कारण? 

resort
resort

चंद्रपूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. यातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पही सुटले नाहीत. उन्हाळ्यात वाघांच्या दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांनी यंदा ताडोबाकडे पाठ फिरविली. त्याचा मोठा फटका ताडोबातील रिसोर्टचालक, स्टे होमचालक, गाईड, जिप्सीचालकांनाही बसला. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. त्यानंतर पर्यटक येतील, अशी आशा होती, मात्र अजूनही पर्यटक जंगलभ्रमंती टाळत असल्याने रिसोर्ट, स्टे होमचा व्यवसाय ठप्प पडला आहे. 

जगात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. ६२५ हेक्‍टरवरील या प्रकल्पात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, हरीण, कोल्हे, ससे, नीलगाय, सांभर, चितळ यांसह अन्य प्राणी आणि विविध पक्षी आहेत. गेल्या काही वर्षांत देशातील पर्यटक ताडोबात पर्यटनाच्या दृष्टीने येऊ लागले. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे अनेकांनी जागा विकत घेऊन रिसोर्ट, स्टेहोम उभारले. त्यातून ताडोबा जंगलालगत असलेल्या अनेक गावांतील लोकांना रोजगार मिळाला.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोहुर्ली, खुटवंडा, झरी, कोळसा, कोलारा, नवेगाव यांसह अन्य गेट आहेत. या सर्वच गेट परिसरात जवळपास ४० ते ५० रिसोर्ट आहेत. शिवाय अनेकांनी पर्यटकांसाठी स्टेहोम सुरू केले आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. यात पाचशे ते सहाशे कर्मचारी कार्यरत आहेत. मार्च महिन्यात देशात कोरोनाने हातपाय पसरले. त्यामुळे शासनाने लॉकडाउन जाहीर केला. यातून ताडोबाही सुटले नाही. 

मार्च महिन्यापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पही बंद आहे. आज जवळपास पाच महिन्यांचा काळ लोटला तरी पर्यटन सुरू झाले नाही. त्यामुळे पर्यटनावर आधारित शेकडो लोकांचा रोजगार बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा सुगीचा हंगाम म्हणजे उन्हाळा. चार महिन्यांत देश-विदेशातील शेकडो पर्यटक ताडोबाला वाघाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे इथला छोटा-मोठा व्यवसाय उन्हाळ्यात बहरतो. अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.

उन्हाळ्यातील चार महिन्यांचा हंगाम येथील लोकांना वर्षभर जगण्याची सोय करतो. मात्र, यावेळी आलेल्या कोरोना संकटाने या लोकांच्या जगण्यावरच आघात केला. आता टाळेबंदी उठविण्यात आली. ताडोबात पर्यटक येतील, अशी आशा होती. मात्र, ते येतच नसल्याने येथील सारेच उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामळे रिसोर्ट, स्टेहोम, छोटे व्यावयायिक, चहाटपरी, किराणा, भाजीपाला विक्रेते, टुरिस्ट गाईड यांच्या हातात पाच महिन्यांपासून एक पैसासुद्धा आला नाही. त्यामुळे ते आणि त्यांचे कुटूंब उपासमारीच्या गर्तेत सापडले आहे. 


उन्हाळ्यात आमचा हंगाम असतो. यंदा कोरोनामुळे तो बुडाला. पाच महिन्यांपासून रिसोर्ट बंद आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, रिसोर्टचे व्यवस्थापन करायचे तरी कसे, असा प्रश्‍न आमच्यासमोर उभा आहे. ताडोबावर आधारित अनेकांचा रोजगार बुडाला आहे. राज्य शासनाने यावर तोडगा काढावा. 
- विवेक वेखंडे, 
अध्यक्ष, रिसोर्ट असोसिएशन ताडोबा प्रकल्प. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com