बाळ रडले अन्‌ रेल्वे प्रवासी आनंदले

बाळ रडले अन्‌ रेल्वे प्रवासी आनंदले

नरखेड, ता. 2 : नरखेड स्थानकावर थांबा नसलेली रामेश्‍वरम एक्‍स्प्रेस अचानक थांबली. रुग्णवहिकाही प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. प्रवाशांना काय होते ते कळायला मार्ग नव्हता. त्यातच एक परिचारिका धावत आली. तिने महिलेला डब्यातून काढून रुग्णवाहिकेत बसवले. तेवढ्यातच बाळाचा रडण्याचा आवाज सुरू झाला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चेन्नई येथे कामानिमित्त राहणारे मनोजकुमार राम विश्वकर्मा (रा. गौर, बादशाहपूर, जौनपूर, उ.प्र.) हे गर्भवती पत्नी पूनम व इतर दोन नातेवाइकांसह गाडी क्रमांक 15119 रामेश्वरम-मंडुवाडीह एक्‍स्प्रेसने चेन्नईहून वाराणशीला जात होते. शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता रामेश्‍वरम एक्‍स्प्रेसने नागपूर स्टेशन सोडल्यावर पूनमला प्रसूती कळा येऊ लागल्या. त्यामुळे पतीसह नातेवाईक काळजीत पडले. सुरुवातीला गाडीत कुणी डॉक्‍टर आहे का, याचा शोध सुरू झाला. डॉक्‍टर सापडलेच नाहीत शिवाय गाडीचा पुढील थांबा इटारसी असल्याचे माहिती झाल्याने काळजी वाढतच गेली. तोपर्यंत गाडी काटोल स्थानकावर पोहोचली होती. अशात काही प्रवासी मदतीसाठी पुढे आले. त्यांनी महिलेच्या पतीच्या माध्यामतून टीटीई व गार्डला माहिती दिली. त्यांनी तत्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र तोपर्यंत काटोल स्टेशन निघून गेले होते. पूनमची प्रकृती पाहता रुग्णवाहिका नरखेड स्थानकावर थांबविण्याच्या सूचना दिल्या. गार्ड व टीटीईने लोको पायलटला व नरखेड स्थानकाच्या स्टेशन मास्टरला गाडीचा थांबा नरखेड येथे देण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत या घटनेची माहिती नागपूरच्या विभागीय कार्यालयाला देण्यात आली. नरखेड स्थानकावर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तयार होती. प्रसूतीनंतर पूनमला इतर तपासण्यांसाठी नरखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पती मनोज तिच्यासोबत आहेत.गाडीत डॉक्‍टर दाखल व्हायच्या आतच बाळ पोटातून अर्धे बाहेर आले होते. प्रसंगावधान राखून तिला तशाच अवस्थेत रुग्णवाहिकेत बसविले. डॉ. प्रीवेश नाडेकर यांनी नरखेड ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. प्रसंग बाका असल्याने सर्वांनी रुग्णवाहिकेतच उर्वरित प्रसूती करण्याचे ठरविले. रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर, नर्स व चालक चालक सुनील कवराई यांचे सर्वांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com