नाथाभाऊंच्या ‘बहुजनत्वाचे’ जिल्ह्यात पडसाद!

राम चौधरी 
Wednesday, 11 December 2019

गोपाल पाटील यांचा राजीनामा ः अनेक बिनीचे शिलेदार भाजपचा तंबू सोडण्याच्या तयारीत

वाशीम : ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात पक्षाच्या बांधणीपासून पायाचे दगड ठरलेले पक्षाचे शिलेदार भारतीय जनता पक्षात अपमानीत होत असल्याचा आरोप बहुजन शिलेदारकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या 25 वर्षांपासून कार्यकर्ते असलेले व सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले गोपाल पाटील राऊत यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, जिल्ह्यामध्ये जिल्हा नेतृत्त्वाकडून बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला अपमानीत केले जात असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या बहुजनवादाचे जिल्ह्यात पडसाद उमटत असून, अनेक दिग्गज शिलेदार भाजपचा तंबू सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये सध्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. कठीण काळामध्ये जिल्ह्यात ऋषाभाऊ देव, तुळशीराम जाधव, भास्करराव रंगभाळ, शाम देशपांडे, विजयराव जाधव, लखन मलिक, सुरेश लुंगे, सुधाकर परळकर या शिलेदारांनी कठीण काळात पक्षाचा झेंडा फडकत ठेवला. मात्र, दिल्लीत व राज्यात सत्ता आल्यानंतर सत्तेच्या गुळासोबत अनेक मुंगळे पक्षात आले. पक्षाने सुद्धा त्यांना पावन करून घेतले. मात्र, जुने जाणते कार्यकर्ते दूर फेकल्या गेले. त्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यपातळीवर भाजपचे संस्थापक सदस्य एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची पक्षाने उमेदवारी कापली. तर, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. हा पराभव स्वपक्षीयांनीच केला, असाही आरोप झाला. या आरोपानंतर भाजपमध्ये बहुजन नेतृत्त्वाच्या कोंडीला एकनाथ खडसे यांनी तोंड फोडले. परिणामी, राज्यात दाबलेल्या बहुजन नेतृत्त्वाकडून स्वाभिमान व्यक्त होऊ लागला. वाशीम जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले. गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देणे सर्वसामान्य बाब असली तरी, गोपाल पाटील राऊत यांनी राजीनामा पत्रात नमूद केलेल्या बाबी जिल्हा नेतृत्त्वावर व त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित करणार्‍या ठरल्या आहेत.

Image may contain: 1 person, close-up

भाजप जिल्हाध्यक्षाला पक्ष संघटनेचा अनुभव नाही 
वाशीम जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांनी नेमलेले जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना पक्ष संघटनेचा कोणताही अनुभव नाही. ते संघटनेतून आले नाहीत. त्यामुळे जुन्या -जाणत्या भाजपच्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अन्यायकारक व अपमानजनक वागणूक देतात. उलट अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यकर्त्यांना व कानाखालच्या लोकांना पदांची खैरात वाटतात. या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या मतदारसंघाशिवाय पक्ष संघटनेचे काहीही देणे-घेणे नाही. कायम अपमानीत केले गेल्याने आपण पदाचा राजीनामा दिला. अशीच परिस्थिती राहिली तर येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने लक्ष घातले नाही तर, याची किंमत पक्षाला मोजावी लागणार आहे. अशी प्रतिक्रिया गोपाल पाटील राऊत यांनी दिली.

 

Image may contain: 1 person, close-up
हा राज्यस्तरावरचा विषय 
गोपाल पाटील राऊत हे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. हा जिल्ह्याचा विषय नाही. आपण तो राजीनामा पक्षांच्या वरिष्ठांकडे पाठविला आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष तथा कारंज्याचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली. 

अनेक शिलेदार तंबू सोडण्याच्या तयारीत
गोपाल पाटील राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील बहुजन नेतृत्त्वामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दोन वेळा मालेगाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविणारे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देणारे गोपाल पाटील राजीनामा देत असतील तर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्त्वासमोर नक्कीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Results in the district after Eknath Khadse