
मोहगाव येथील शेतकरी गजानन काळे यांचा जन्म 15 डिसेंबर 1940 ला शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 18 व्या वर्षांपासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. 60 वर्षे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत त्यांनी शेती केली. आयुष्यात अनेक उतार-चढाव बघितले. प्रसंगी नापिकीचाही सामना केला पण हिंमत हारली नाही. कुठलीही कुरबूर न करता अत्यंत संयम ठेवून शेती केली.
मोहाडी (जि. भंडारा) : सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या चाकरमान्यांचे निरोप समारंभ व सेवानिवृत्तीच्या सत्काराचे सोहळे होतात. परंतु, अशा पद्धतीचा हेवा वाटणारा शेतकरी वडिलांबद्दल आपुलकी व आभार व्यक्त करण्याचा सोहळा मात्र, निराळाच.
शेतात अहोरात्र घाम गाळून पीक घेणारा अन्नदाता शेतकरी हा खऱ्या अर्थाने काळ्या आईची, देशाची आणि जनतेची सेवा करतो. परंतु, कधीही त्याच्या श्रमाचे आणि सेवेचे कौतुक होत नाही. परंतु, तालुक्यातील मोहगाव येथील शेतकरी वडिलांच्या प्रेमपूर्ण ऋणातून मुक्त होण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचा जंगी सोहळा साजरा केला. निमंत्रण पत्रिका वाटून, गावातून वाजत-गाजत सजविलेल्या बैलबंडीवरून मिरवणूक काढून संपूर्ण गावाला स्नेहभोजन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आगळ्या-वेगळ्या सन्मान सोहळ्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत रंगली होती.
मोहगाव येथील शेतकरी गजानन काळे यांचा जन्म 15 डिसेंबर 1940 ला शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 18 व्या वर्षांपासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली. 60 वर्षे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत त्यांनी शेती केली. आयुष्यात अनेक उतार-चढाव बघितले. प्रसंगी नापिकीचाही सामना केला पण हिंमत हारली नाही. कुठलीही कुरबूर न करता अत्यंत संयम ठेवून शेती केली.
शेती करतानाच कुटुंबाचा प्रपंच सांभाळून मुलांनाही शिकवले. त्यांची दोन्ही मुले शासकीय नोकरीत आहेत. आजवर शेतात राबणाऱ्या शेतकरी वडिलांनी आता यापुढे काम करू नये, असा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. 15 डिसेंबरला वयाच्या 79 व्या वर्षी त्यांना शेतीसेवेतून निवृत्त करण्यात आले. शेतावरच निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी गावातून बैलगाडीने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. शेतशिवारातील शामियानात त्यांचा ह्वद सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापुरे, नातेवाइकांसह गावातील दोनशे नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - Video : जर्मनीची ही संशोधक काय शोधायला आली भारतात? वाचा...
गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांचा गौरव
काळे कुटुंबीयांनी वडिलांना शेती कामातून दिलेल्या निवृत्ती कार्यक्रमात 65 वर्षे पूर्ण झालेल्या गावातील रामकृष्ण चकोले, राघोजी भोंगाडे, रामेश्वर बाळबुद्धे, बाबुराव साखरवाडे, रामकृष्ण कडव व महिला शेतकरी मंदाबाई मोहतुरे यांचा सत्कार केला. उपस्थितांना शेतात पिकविलेली फळे व भाज्या भेट म्हणून देण्यात आल्या.
अनोखे स्नेहभोजन
कार्यक्रमाला आलेल्या नातेवाईक व गावकऱ्यांसाठी शेतावरच स्नेहभोजन देण्यात आले. ज्वारीच्या भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत व दही असा आगळावेगळा व शेतकऱ्याला शोभेल असाच मेन्यू हे जेवणाचे वैशिष्ट्य होते. गजानन काळे यांचे भाऊ चंद्रशेखर, मुले चंद्रशेखर, संजय, रमेश आणि प्रकाश, सून विद्या या सर्वांनी पाहुण्यांचे स्वागत करून सरबराई केली.
मुलांच्या आग्रहाखातर निवृत्त होतोय
शेतीशी व मातीशी असलेली माझी नाळ कधीच तुटणार नाही. शेतकरी हा कधीच निवृत्त होत नसतो. शरीर थकल्याने मुलांच्या आग्रहाखातर आता शेतकामापासून दूर होत आहे. शेतीपासून मी कधीच दुरावणार नाही.
- गजानन काळे
सेवानिवृत्त शेतकरी, मोहगाव