कोट्यवधींचा महसूल बुडाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातील सर्व प्रमुख व्यवहार व कामकाज ठप्प होते. यामुळे नागरिकांची अडचण झाली असून शासनाला कोट्यवधीच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातील सर्व प्रमुख व्यवहार व कामकाज ठप्प होते. यामुळे नागरिकांची अडचण झाली असून शासनाला कोट्यवधीच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

सहाव्या वेतन आयोगानुसार नायब तहसीलदारास ग्रेड पे मिळावा, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे, नायब तहसीलदार संवर्गाचे पद सरळ सेवेने 33 टक्‍केऐवजी 20 टक्‍के करावे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, दांगट समितीच्या अहवालानुसार आकृतिबंध तयार करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, व्यपगत करण्यात आलेली पदे पुनरुज्जीवित करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वीही महसूल कर्मचारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. शासनाच्यावतीने यातील अनेक मागण्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मागण्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक सेवांवर परिणाम झाला. अधिकारी वर्ग पंगू झाले होते. त्यामुळे फाईली निकाली निघण्याचे प्रमाण मंदावले होते. तहसील कार्यालयातील अनेक सेवा आज बंद होत्या. नागरिकांना रहिवासी, जात, उत्पन्न आदी दाखले मिळाले नाही. सेतू कार्यालयात दाखले मिळणे सुरू होते. मात्र, नागरिकांची प्रचंड गर्दी होती. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 31 ला एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे. तर 5 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात राज ढोमणे, पी. वाडीभस्मे, पी. बावस्कर, व्ही. खारोडे, ए. महल्ले, एस. चरडे, गणेश शिंदोडकर, अभिषेक हिवसे, रसिका झंझाळ, सतीश सूर्यवंशी, स्नेहल खवले, रुख्साना शेख, टी. कावडकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The revenue of billions was wasted