राज्याच्या क्रीडा धोरणातील चुकांमुळेच खेडाळूंसमोर उपजीविकेचा प्रश्‍न - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

राज्याचे युवा व क्रीडा धोरण लोकाभिमुख करण्यात शासन व प्रशासनाला अपयश आल्याने क्रीडापटूंच्या प्रगतीत बाधा निर्माण होत असल्याची टीका राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली.

यवतमाळ - राज्याचे युवा व क्रीडा धोरण लोकाभिमुख करण्यात शासन व प्रशासनाला अपयश आल्याने क्रीडापटूंच्या प्रगतीत बाधा निर्माण होत असल्याची टीका राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली. ते येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित ’चीतपट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे रविवारी (ता. 24) बोलत होते.

क्रीडा पत्रकार नीलेश भगत यांच्या ’चीतपट’ पुस्तकाचे प्रकाशन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाठक होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, संपर्कप्रमुख संतोष ढवळे, कबड्डीपटू प्यारेलाल पवार, शैलेश भगत व क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदींची मंचावर उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले की, ’मला राज्यभर फिरत असताना अनेक खेडाळू भेटतात. ते सांगतात की, राज्याचे क्रीडा व युवा धोरण हे खेडाळूंसाठी पोषक नाही.’ यवतमाळ येथील राष्ट्रीय खेडाळू कल्पना खान ही धुणीभांडी करून जीवन जगत असल्याचा उल्लेख ’चीतपट’चे लेखक नीलेश भगत यांनी भाषणातून केला असता त्यावर मत व्यक्त करताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्याचे युवा धोरणावर खेडाळू खूष नाहीत. या धोरणातील चुकांमुळेच कल्पना खानसारख्या राष्ट्रीय खेळाडूला हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. कल्पना खानसह जिल्ह्याचा गौरव वाढविणार्‍या सर्व खेडाळूंचा सामूहिक सत्कार करून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठीही पुढाकार घेणार असल्याचे मत श्री राठोड यांनी व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Revenue minister criticized on State Sports Policy