राजगुरूंच्या क्रांतिकारी योजनेला आवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर ः इंग्रज अधिकारी सॉंडर्सच्या हत्येनंतर भूमिगत झालेले क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू नागपूरला आले. भूमिगत असले तरी शहीद राजगुरू संतापाने इंग्रजांचा वचपा काढण्याची योजना घेऊनच नागपुरात आले. सीताबर्डी किल्ला उद्‌ध्वस्त करून इंग्रजांना सळो की पळो करण्याच्या त्यांच्या योजनेवर तत्कालीन सुज्ञ नागपूरकरांनी आवर घातली. त्यामुळे शहराच्या इतिहासात केवळ राजगुरू आले अन्‌ गेले, एवढीच नोंद दिसून येते.

नागपूर ः इंग्रज अधिकारी सॉंडर्सच्या हत्येनंतर भूमिगत झालेले क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू नागपूरला आले. भूमिगत असले तरी शहीद राजगुरू संतापाने इंग्रजांचा वचपा काढण्याची योजना घेऊनच नागपुरात आले. सीताबर्डी किल्ला उद्‌ध्वस्त करून इंग्रजांना सळो की पळो करण्याच्या त्यांच्या योजनेवर तत्कालीन सुज्ञ नागपूरकरांनी आवर घातली. त्यामुळे शहराच्या इतिहासात केवळ राजगुरू आले अन्‌ गेले, एवढीच नोंद दिसून येते.

इतिहासातील नोंदीनुसार लाहोर येथे 17 डिसेंबर 1928 रोजी इंग्रज अधिकारी सॉंडर्सच्या हत्येनंतर तीन दिवसांनी अर्थात 20 डिसेंबर 1928 रोजी राजगुरू, सुखदेव, भगतसिंग हे तिन्ही क्रांतिकारक भूमिगत झाले. राजगुरू यांना 30 डिसेंबर 1929 रोजी पुण्यात अटक झाली. अर्थात ते एक वर्ष भूमिगत होते. याच काळात ते नागपूरला आले. याबाबतची नोंद लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृहाच्या सुवर्णमहोत्सव व अमृतमहोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत आहे. या संस्थेचा सुवर्णमहोत्सव 1974-75 या वर्षात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत तत्कालीन एका वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजगुरू यांनी अनाथ विद्यार्थी गृहाला भेट दिल्याचे नमूद केले आहे. हा किस्सा लिहिताना तत्कालीन संपादकांनी सुरुवातीलाच '45 वर्षे लोटली त्या प्रसंगाला' असे नमूद केले. त्यामुळे राजगुरू 1929 मध्ये शहरात होते, यास दुजोरा मिळत आहे. मात्र, ते नेमके किती काळ नागपुरात होते, याबाबत स्पष्ट नोंद नाही. बालपणाची आठवण सांगताना या संपादकांनी त्यांच्या वडिलांसोबतचा प्रसंग या स्मरणिकेत उभा केला. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेल्या किश्‍श्‍यानुसार राजगुरू इंग्रजांचा वचपा काढण्यासाठी सीताबर्डी किल्ला उद्‌ध्वस्त करण्याच्या क्रांतिकारक योजनेसह नागपुरात आले होते. राजगुरू यांची योजना अमलात आली तर नागपूकरांवर मोठे संकट येण्याची शक्‍यता व्यक्त करीत तत्कालीन शहरातील सुज्ञ नागरिकांनी त्यांना आवर घातला. त्यानंतर काही दिवस ते नागपुरात होते. परंतु, त्यांना गणवेश बदलून राहावे लागले. त्यांनी नागपुरातील विविध संस्थांना भेट दिली. परंतु, योजना अमलात आणल्याची खंत घेऊन त्यांनी नागपूर सोडल्याचा उल्लेखही स्मरणिकेत आहे. त्यामुळे नागपूर शहराचा इतिहास एका सुवर्ण पानापासून वंचित राहिला. मात्र, त्यानंतर नागपूरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देत इंग्रजांना नागपुरातूनही पळवून लावत राजगुरूंचे स्वप्न पूर्ण केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revolutionary plan of the Rajguru